तत्कालीन संरक्षणमंत्री म्हणून पर्रीकरांनी राफेल व्यवहारप्रश्‍नी स्पष्टीकरण द्यावे

0
143

>> कॉंग्रेस नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची पत्रकार परिषदेत मागण

केंद्र सरकारचा राफेल खरेदी मोठा घोटाळा आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राफेल घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राफेल खरेदी प्रकरणी राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला.
राफेल विमान खरेदीच्या काळात संरक्षण मंत्री म्हणून गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यरत होते. या खरेदीमध्ये पर्रीकर यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही, असा दावा चतुर्वेदी यांनी केला. या पत्रकार परिषदेला गोवा प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रवक्ते रमाकांत खलप उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून प्रति राफेल विमान ५२६.१० कोटी रुपये दराने १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात १८ राफेल विमाने फ्रान्समधून तयार करून आणणे आणि १०८ राफेल विमाने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेड या कंपनीकडून तंत्रज्ञान देवाणघेवाणीच्या माध्यमातून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दरानुसार, ३६ विमानांसाठी १८,९४० कोटी रुपये खर्च आला असता, अशी माहिती चतुर्वेदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५ मध्ये पूर्वीचा निर्णय बाजूला ठेवून ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रति विमानासाठी १६७०.७० कोटी खर्च करावा लागणार आहे. ३६ विमानांसाठी ६०,१४५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पहिले ३६ राफेल विमाने सप्टेंबर २०१९ आणि शेवटचे विमान २०२२ मध्ये मिळणार आहे, असे चतुर्वेदी यांनी सांगितले. राफेल विमान खरेदीवर अतिरिक्त ४१,२०५ ककोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.