राज्यातील संचारबंदी मागे घेण्याबाबत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत विचारविनिमय करून त्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याच्या टक्केवारीत आणखी घट होणे गरजेचे आहे. राज्यात दरदिवशी ३ ते ४ टक्के नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तीन ते चार महिन्यानंतर पहिल्यांदाच राज्यात शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली. राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असलेले डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचार्यांच्या अथक कष्टाचे हे फळ आहे. आता राज्यातील नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी हातभार लावला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
महामंडळ अधिकार्यांसमवेत बैठक
दरम्यान, काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध सरकारी महामंडळांच्या अधिकार्याची बैठक घेतली. विविध सरकारी महामंडळांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महसूल वाढविण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर दिली.