‘ढ’ मुलांसाठी शाळेतच दोन तास विशेष वर्ग

0
21

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी

अभ्यासात कमकुवत असलेली मुले मागे राहू नयेत, यासाठी शाळेचे नियमित वर्ग संपल्यानंतर खास या मुलांसाठी सुमारे दोन तास शिक्षकांना विशेष वर्ग भरवण्यास सांगण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर शिक्षकांना सायंकाळी ४ वाजेपर्यंत शाळेत राहून हे विशेष वर्ग घ्यावे लागणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. यापुढे राज्य सरकार शिक्षणाच्या दर्जाचे मूल्यांकन सर्वेक्षण करणार असल्याचेही ते म्हणाले.

कालपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, सकाळच्या प्रश्‍नोत्तराच्या तासाला आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. चालू वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

व्हेन्झी व्हिएगस यांनी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत शिक्षणासंबंधीच्या राष्ट्रीय मूल्यांकन सर्वेक्षणात गोव्याचे गुणांक काय आहेत, त्यासंबंधीची तपशील माहिती द्यावी, अशी मागणी केली होती. या प्रश्‍नाचे उत्तर देताना सावंत यांनी हा सर्वे हा तीन वर्षांनी एकदा करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासंबंधीचा दर शैक्षणिक वर्षाचा अहवाल देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. राज्यातील मुलांचा शिक्षणाचा दर्जा चांगला रहावा व ती शिक्षणात मागे राहू नयेत यासाठी सरकारतर्ङ्गे जी पावले उचलण्यात येतात, त्याविषयीची माहिती सावंत यांनी सभागृहात दिली. विद्यालयांना शिक्षणासाठीची आवश्यक सर्व साधनसुविधा शिक्षण खात्यातर्ङ्गे पुरवण्यात येत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

त्यावर बोलताना व्हिएगस यांनी केवळ साधनसुविधा पुरवल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारणार नसल्याचे स्पष्ट केले. अल्पसंख्याकांतर्ङ्गे चालवण्यात येत असलेल्या शिक्षण संस्थांकडेही राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर बोलताना सावंत यांनी सरकार शिक्षणाचा विचार करताना अल्पसंख्याकांच्या संस्था व बहुसंख्याकांच्या शिक्षण संस्था असा ङ्गरक व भेदभाव करीत नसल्याचे नमूद केले.

यंदापासून नवे शैक्षणिक धोरण
चालू शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठीचा अभ्यासक्रमही तयार करण्यात आलेला आहे. शाळांना ३ वर्षांच्या मुलांना प्रवेश देण्याची सूचना करण्यात आलेली आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

जी मुले शिक्षणात मागे आहेत व ज्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे, अशा मुलांसाठी शाळांचे नियमित वर्ग संपल्यानंतर त्यांच्यासाठी शिक्षकांनी भोजनानंतर आणखी दोन तास विशेष असे अतिरिक्त वर्ग घ्यावेत यासाठी शाळा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून हे अतिरिक्त वर्ग घेण्यात येणार आहेत. चालू वर्षापासून कोडिंग व रोबोटिक्सचे वर्गही सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.