– दत्ता भि. नाईक
एनसीईआरटीद्वारा निर्मित नववीच्या पुस्तकात परमपूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका गोगलगाईवर बसलेले असून त्यांच्यावर पंडित नेहरू चाबकाचे फटकारे मारीत आहेत असे दाखवणारे व्यंगचित्र घातलेले आहे. ही गोष्ट संतापजनक आहेच. याला जबाबदार असणार्या श्री. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणे योग्य नसले तरीही या देशातील लोकांच्या प.पू. आंबेडकर यांच्याप्रती असलेल्या भावनांचा पुस्तकाच्या निर्मात्यांनी विचार करणे आवश्यक होते. याशिवाय आपल्यामध्ये असा एक वर्ग आहे की, ज्यांचे प.पू. आंबेडकर हे एकमेव दैवत आहे. याचा पळशीकरांना कसा विसर पडला हाच मोठा प्रश्न आहे.
ज्या काळात हे व्यंगचित्र काढले गेले त्या काळात पंडित नेहरूंच्या देखण्या व्यक्तीमत्वाची सर्वांनाच भुरळ पडली होती, हे खरे असले तरीही, सरदार वल्लभभाई पटेल यांची पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेस संसदीय गटानेच बहुमताने निवड केलेली असतानाही उच्च कुळातले असल्यामुळे असेल वा शेवटचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांचे ‘खास’ मित्र असल्यामुळे असेल पंडितजींचा देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून शपथविधी झाला. भारत जागतिक शक्ती होईल असे कधीही पंडितजींना वाटले नाही. संरक्षण खात्याच्या कारखान्यातून प्रेशर कूकर व कॉफी बनवावी असे मत मांडणारे, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात सातत्याने अडचणी उपस्थित करणारे आणि पैसेवाल्यांच्या मुलांचे ‘चाचा’ असणारे पंडित नेहरू यांनी हयातभर सोव्हिएत युनियनचे कौतुक करण्यातच धन्यता मानली.
१९६२ मध्ये चीन समोर देशाचा अपमानकारक पराभव याच पंडितजींमुळे झाला. आसामच्या तेजपूर शहरातून सर्व कागदपत्रे हलविण्याचे काम व भारतीय चलनातील नोटा जाळण्याचे काम (पोर्तुगीजांनीही गोवा सोडताना अशाच नोटा जाळल्या होत्या) सुरू झाले होते. भारताची सीमा बंगालच्या कुचबिहार पर्यंत मागे घ्यायची तयारी याच पंडितजींनी केली होती, हे जनता अद्याप विसरलेली नाही. पंडितजींच्या ऐवजी प.पू. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले असते, तर या देशावर एव्हढ्या नामुष्कीचा प्रसंग आलाच नसता. विस्तारभयास्तव हे थोडक्यात!