– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
डॉक्टरही आजारी पडतात. त्यांनाही रोग जडतात. त्यांनाही हसावेसे वाटते. मलाही भयंकर संताप येतो. वाढला तर हल्ली सरळ गोळी घेतो. नाहीतर म्हातारी झालेली नस फुटून जाईन. मग आयुष्याचे खोबरे व्हायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, आम्हा डॉक्टर या प्राण्यांवर उपचार करा. दया दाखवा व सोडा. नकळत आमच्यावर हेरगिरी मुळीच करू नका. करणार नाही ना! नाहीतर मग म्हणाल, ‘‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’’
………
त्या दिवशी रविवार होता. पेशंट येणे चालूच होते. रविवार हा डॉक्टरांचा विश्रांतीचा दिवस. पण मला विश्रांती ठाऊक नव्हती. पेशंटकरिता घर नेहमीच उघडे होते. ‘पैलतिरा’तील वयोवृद्ध नायकाचा नातू वडिलांबरोबर माझ्या दवाखान्यात आला होता. त्याच्या आधल्या दिवशी माझी ‘बियरची बाटली’ ही कथा पेपरवर आली होती. त्या १८ वर्षांच्या नातवाने ती वाचली. वडिलांना तो विचारू लागला, ‘‘डॉक्टर पण बियर पितात?’’ आता तो पोरगा माझ्या तावडीत आयता सापडला होता. मी त्याला चांगले फुकाचे लेक्चर देऊन मोकळा झालो. नातू व त्याचे वडील निघून गेले. जाताना लेखनाला विषय देऊन गेले. मी स्तब्ध झालो. आत्मकेंद्रित झालो. पोराने चक्क समाजातर्फे डॉक्टरांविषयीचे मत दिले होते. समाज अजूनही डॉक्टर या पेशाकडे आदराने बघतो. लोकांना वाटते, डॉक्टर लोकांनी पुष्कळ गोष्टी करू नये. आपण केल्या तरी चालतील.
मला आठवते, जागतिक आरोग्य संघटना ७ एप्रिल या दिनी प्रतिवर्षी आपले घोषवाक्य सादर करते. त्या वर्षी ‘धूम्रपान की आरोग्य, निर्णय तुमचाच!’ हे घोषवाक्य होते. त्या दिवशी राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर कार्यक्रम ठरलेला असतो. एके दिवशी समारंभ चालू होता. वरिष्ठ डॉक्टरांचे भाषण चालू होते. सिगरेटचा झुरका घेत घेत ते बोलत होते. लोकांना सल्ला देत होते; स्वत:ला नाही. हे तर अतिच झाले म्हणायचे. जर गावाबाहेर गेलो व तहान लागली तर सोडा, पेय घ्यायला दुकानात जातो. गोव्यात चहाची हॉटेल्स कमी, बार पावलोपावली; पण बारमध्ये जाऊ शकत नाही ना! सोडाही घ्यायला जाऊ शकत नाही. पण, एकदा मला जावेच लागले. दुसर्या दिवशी माझे मित्र गालातल्या गालात हसत फिरकी घेत होते. त्यांनी म्हणे माझी चोरी पकडली होती. काल तर तुम्ही राव, अमुक अमुक बारमधून बाहेर पडलात. तुम्ही एवढे शौकीन आहात याची आम्हांला पुसटशी शंकापण नव्हती. गेलो तर बरोबर कुणाला तरी घेऊन जायचे, मग त्याला पाजायची व आपण ‘फांता’ घोटायचा. म्हणजे ‘रडणारी’ बियर पिण्याचे भाग्य पण डॉक्टर या प्राण्याच्या नशिबात नसायचे. बरे झाले लहानपणात मी कितीतरी दारुड्यांना बघितले होते. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना बघितले. माझ्या जवळच्या माणसांना बघितले. एवढी किळस वाटली की, तेव्हाच ठरवले व्यसनांच्या नादी लागायचे नाही. माझ्या वडिलांनी सगळ्या व्यसनांची टेस्ट घेतलेली. आपले आयुष्य ते मनसोक्त जगले. सिगरेट, विड्या ओढल्या. दारू घेतली. दारू पिऊन नाटकात सुधाकरही रंगवला, पत्त कुटले. रेशनकार्डवर माझ्या नावावर दिले जाणारे सगळे रेशनही फस्त करून टाकले. माझ्या नावे कुठलेही व्यसन बाकी ठेवले नाही. अशा कितीतरी लोकांनी माझ्यावर एक प्रकारे उपकारच केले. त्या दिवशी रस्त्यालगतच्या गटारात पडलेला माणूस माझ्याकडे बघून उपहासाने हसत होता. स्वर्गातल्या इंद्रासारखा, जणू अप्सरांबरोबर रममाण झाला होता…! बरे झाले बाबा, मी डबक्यात पडलो नाही. तरीदेखील काहीजण अजूनही मला डबक्यात ढकलू पाहतात! मग ते फिदीफिदी हसणार अन् म्हणणार, डॉक्टर तुम्हीसुद्धा?
एक डॉक्टर मित्र आहेत. कुठल्याही कार्यक्रमात गेल्यावर ते चौकशी करतात. खायला-प्यायला आहे ना? कुठल्या ब्रँडची, का ती नेहमीचीच! वेगळी हवी म्हणजे जीवन कसे मजेशीर जगायला हवे. ते ‘डॉक्टरकी’ करत नाहीत. त्यांना पूर्ण मुभाच आहे. हा पेशा करणार्यांना मदिरा पिण्याची सक्त मनाई आहे. त्या डॉक्टरांचे भाषण आयोजकांनी ठेवले होते. डॉक्टर एरवी चांगले बोलतात; पण त्या दिवशी तर कहरच झाला. मी खूष झालो. प्रश्न पडला. विचार करू लागलो. डॉक्टरसाहेबांना शेक पिण्याची व्यवस्था केली होती. सहसा वक्ता पाण्याचा ग्लास समोर ठेवून बोलतो. म्हणजे घसा बसला तर पाण्याचा घोट घेत घसा साफ करायचा. पहिल्यांदाच कुणी एखादा वक्ता ‘शेक’चे घोट घेत घेत व्याख्यान देत होता. मला ते गुपित मग कळले. माझे एक दुसरे डॉक्टर मित्र, त्यांनी तर कहरच केला. म्हणजे तो प्रत्येक वेळी कहरच करत होता. त्यांनी फांता – ऑरेंज ग्लासची ऑर्डर दिली. मी आश्चर्यचकित झाले. मग इकडे तिकडे बघत बियरची पण ऑर्डर दिली. आम्ही त्या गावचे नसल्यासारखे करत बोलत राहिलो. डॉक्टरसाहेबांनी चक्क ‘कॉकटेल’ रिचवली.
एकदा मला चिकन चिली व बटर चिकन खायची इच्छा झाली. ते त्याच बारमध्ये चांगले मिळते असे कुणीतरी म्हटले होते. म्हटले चला निघूया. आमची सवारी बारच्या हॉलमध्ये प्रवेश करती झाली. सगळे चेहरे ओळखीचे. त्यांच्या नजरांना नजर न भिडवता तडक टेबल पकडले. सर्वांच्या भुवया वर झालेल्या बघितल्या. व्याकरणातील सगळी प्रश्नचिन्हे आपली नेहमीची जागा सोडून सर्वांच्या चेहर्यावर आसनस्थ झाली. ‘‘डॉक्टरसाहेब तुम्ही पण?’’ मूक चेहर्याने मला प्रत्येकजण विचारत होता. मी ऑर्डर दिली. कोला घेतला आणि घोटत राहिलो. परत एकदा प्रत्येकासमोर प्रश्नचिन्ह उभे होते. डॉक्टरसाहेबांनी कॉकटेलची ऑर्डर तर दिली नसेल? बारमालक डॉक्टरांचा मित्र होता. मैत्रीची लाज तरी राखावी लागणार ना? कोला घोटत ऑर्डरची वाट बघत होतो. दारूच्या वासाच्या घमघमाटाने माझी वृत्ती चाळवली होती. केव्हा केव्हा सुंदर युवतीच्या कटाक्षाने वृत्ती चाळवते तशातलाच प्रकार होता. माझ्या पाठीमागच्या टेबलवर पाच-सहा पोरे येऊन बसली. भराभरा चार बियरच्या बाटल्या मागवल्या. पाठोपाठ व्हिस्कीची बाटली पण! चांगले कॉकटेल करत ती पोरे मस्तीत गेली. ही मुभा डॉक्टर लोकांना नाही हां!
तुम्हांला आठवतोय मटका… बीट घेणार्या टपरीशेजारी असलेल्या पानवाल्याच्या दुकानात गेलो असता माझ्या ओळखीच्या एकाने अचंबित चेहर्याने कपाळावर आठ्या चढवत माझी खिल्ली उडवली होती. म्हणजे डॉक्टरांनी पान पण खाऊ नये? तसे तंबाखूचे पान खाऊन पचापचा खाली थुंकणार्या डॉक्टरबायांनाही बघितले होते. तंबाखू, गुटखा, पान सेवन करणे धोक्याचे आहे असे डॉ. शेखर साळकरांबरोबर प्रत्येक डॉक्टरांचे म्हणणे. पण लोक हे सगळे बंद करणार असेल तर मग डॉक्टरांच्या धंद्याचे काय?
मागे एक पेशंट आला होता. म्हणतो कसा, ‘‘डॉक्टरसाहेब मी फक्त ब्रँडीच घेतो.’’ मी गप्प. कारण माहीत आहे. कपाळावर प्रश्नचिन्हाची आठी चढवली. डॉक्टरानेच बनवलीय ती ‘डॉक्टर ब्रँडी!’ वारे एकदम माझ्या एका कानातून दुसर्या कानात निघून गेले. ‘गोवा’ गुटक्याची आठवण झाली. मला वाटत होते गोव्यात कुठेतरी बनत असेल तर बाहेरच्या राज्यातील हा ‘गोवा गुटका’ गोव्याचा म्हणत लोक चघळत होते. वाचकहो, डॉक्टरलोकांनी काय करायचे व काय करू नये हे प्रत्येकाला माहीत आहे. कुणाला सांगू नका हं! डॉक्टर शेवटी माणूसच असतो. त्यांना पण मन असते, हृदय असते. त्यांना पण मजा करायला आवडते, नाचावेसे वाटते. मनमुराद हसावेसेही वाटते. त्या दिवशी मला ताप आला होता. सर्दी, पडशाने हैराण झालो होतो. माझे लालभडक झालेले नाक बघून सगळे रुग्ण विचारायला लागले, ‘‘डॉक्टर तुम्ही पण!’’ अहो राव, डॉक्टरही आजारी पडतात. त्यांनाही रोग जडतात. त्यांनाही हसावेसे वाटते. मलाही भयंकर संताप येतो. वाढला तर हल्ली सरळ गोळी घेतो. नाहीतर म्हातारी झालेली नस फुटून जाईन. मग आयुष्याचे खोबरे व्हायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, आम्हा डॉक्टर या प्राण्यांवर उपचार करा. दया दाखवा व सोडा. नकळत आमच्यावर हेरगिरी मुळीच करू नका. करणार नाही ना! नाहीतर मग म्हणाल, ‘‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’’
…………….