>> आरोग्यमंत्री राणे यांची माहिती
कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या वेगाने पसरणार्या उत्परिवर्तीत विषाणूचा राज्यात फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक ती सगळी सावधगिरी बाळगली जात असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत डेल्टा प्लसचा संसर्ग झालेले रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सावधगिरी बाळगली जात असल्याचे त्यांनी काल एका ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.
शेजारच्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेपलीकडून डेल्टा प्लस या कोरोनाच्या रुप बदलेल्या नव्या विषाणूचा गोव्यात शिरकाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आपण एकूण स्थितीवर खास लक्ष केंद्रीत केले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सीमेजवळील तपासणी नाक्यावर कडक पहारा ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिला असल्याचे राणे यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
भयानक रूप धारण केलेल्या कोरोनाच्या ह्या उत्परिवर्तीत विषाणूचा महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच आतापर्यंत डेल्टा प्लसचा संसर्ग झालेले रुग्ण राज्यात सापडले नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण सापडल्याचे म्हटले होते.