कोरोना उपचारांवरील खर्चाला आयकरातून सवलत

0
99

>> केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

देशभरातून कोरोनाची दुसरी लाट सध्या हळूहळू ओसरू लागली आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबेही उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कुटुंबांना दिलासा देताना केंद्र सरकारने कोविड उपचार आणि मृत्यूनंतर झालेल्या खर्चाच्या रकमेला आयकरातून सवलत देण्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल शुक्रवारी त्याबाबत घोषणा केली.

याबाबत बोलताना केंदीय मंत्री ठाकूर यांनी, केंद्र सरकारने कोरोनामुळे एखाद्याच्या मृत्यूदरम्यान अथवा रुग्णाच्या उपचारादरम्यान खर्च करण्यात आलेल्या कुटुंबाच्या त्या रकमेला आयकरातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुठल्याही कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांना कोरोना उपचारासाठी मदत केली असेल तसेच एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला कोरोना उपचारासाठी आर्थिक मदत केली असेल तर त्या रकमेला आयकरमध्ये सवलत देण्यात येईल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने त्याच्या कर्मचार्‍यासाठी किंवा अन्य कोणासाठी कोविड उपचारासाठी आर्थिक मदत केली तर त्या व्यक्तीला आयकरातून सूट देण्यात येईल असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे कोरोना उपचारासाठी ज्याला आर्थिक फायदा मिळालेला आहे त्यालाही त्या रकमेवर कोणताही कर आकारण्यात येणार नाही, तसेच कोरोना मृत्यूनंतर कंपनीने कर्मचार्‍याच्या कुटंबाला किंवा एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या एखाद्या कुटुंबातील सदस्याला ठराविक रक्कम कोविड उपचारांसाठी म्हणून दिली असेल तर त्या रकमेलाही आयकरातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठराविक रकमेची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षानंतर झालेल्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत
देशात ७७६ डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण दुसर्‍या लाटेत आढळले. तसेच मृत्यूंची संख्याही सर्वाधिक होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार दुसर्‍या लाटेत देशात एकून ७७६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यात बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत १०९ यानंतर उत्तर प्रदेशात ७९, पश्चिम बंगालमध्ये ६२, तामिळनाडूमध्ये ५०, आंध्र प्रदेशात ४०, आसाममध्ये १०, गुजरातमध्ये ३९ आणि झारखंडमध्ये ३९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. याशिवाय मध्य प्रदेशात १६, महाराष्ट्रात २३, ओडिशामध्ये ३४, राजस्थानमध्ये ४४ आणि तेलंगणामध्ये ३७ डॉक्टरांचा मृत्यू झाला.