डिजिटल बँकिंग

0
34
  • – शशांक मो. गुळगुळे

बँकिंग क्षेत्र अतिशय संवेदनशील झाले आहे. डिजिटल इंडिया पाठोपाठ डिजिटल बँकिंग फोफावत आहे; पण त्याचबरोबर मागच्या दाराने त्याचे तोटे वेगाने आत शिरत आहेत याचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

भारतीय बँकिंग प्रगतीशील आहे. संपूर्ण देशाचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता भारतात कोणतीही यंत्रणा राबविणे तसे सोपे नाही. बँकिंग क्षेत्राने आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. पूर्वीचे बँकिंग हे कागदी होते; आता ते मोबाईल झालेले आहे. भारतात, विशेषतः मोठ्या शहरांत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढले आहे म्हणून मोबाईल बँकिंग व्यवहार करताना नेमके काय करावे आणि काय करू नये हे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकास माहीत हवे. आपला पासवर्ड नीट जपायला हवा. कारण चांगला पासवर्ड असेल तरच आपले खाते आणि बँकेबरोबर करीत असलेल्या व्यवहाराची माहिती सुरक्षित राहू शकते. हीच गोष्ट ‘पिन’बाबतचीही आहे. पासवर्ड तयार करताना तुमच्या व्यक्तिगत माहितीशी निगडित शब्द वा आकडे कृपया वापरू नका.

उदा. १) जन्म, महिना किंवा जन्मतारीख हे ‘पासवर्ड’ ठरविताना टाळा. २) पासवर्ड कोणालाच सांगू नका किंवा कितीही निकड असली आणि व्यक्ती कितीही जवळची असली तरीदेखील सांगू नका. सांगण्यामुळे हा घोटाळा झाला तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. ३) मोबाईल किंवा ई-मेलद्वारे पासवर्ड किंवा तशी कोणतीही गोपनीय माहिती पाठवू नका. ४) पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. कोणाच्या हाती लागला तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ५) आपल्या खात्याचा तपशील दाखविणारे ‘बँक स्टेटमेन्ट’ अधूनमधून तपासत रहा. कारण काही चुकून रक्कम जमा झालेली असेल किंवा वजा झालेली असेल तर ते कळू शकते. बँका बर्‍याच वेळा अशा चुकीच्या एन्ट्री खात्यात करतात. ही चूक जेवढी लवकर तुमच्या लक्षात येईल तेवढ्या लवकर तुम्ही ती सुधारू शकता. ६) मोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास तात्काळ बँकेला कळवा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा. ७) आपण आयपीआयएन क्रमांक वारंवार बदलत रहा. हे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. ८) पैसे ट्रान्स्फर करताना नाव व बँकेचे खाते क्रमांक बरोबर आहेत याची दोन-तीन वेळा खात्री करून घ्या. याची १०० टक्के खात्री पटल्यानंतरच पैसे ‘ट्रान्स्फर’ करा. ९) कोणतीही गोपनीय माहिती कधीच कोणाला सांगू नका. कागदाच्या चिटोर्‍यावर किंवा डायरीत लिहू नका. १०) कोणतीही अनोळखी साईट उत्सुकतेने उघडू नका. त्यातून तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस शिरण्याची शक्यता असते. ११) सोशल मीडियाचा वापर करताना आपली माहिती दुसर्‍यांना विनाकारण देऊ नका. १२) बँकेतून फोन आला- मग तो खरोखर असो की फसवा असो- फोनवर कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका. शक्यतो बँकेत जाऊन आलेला फोन खराच होता ना याची चौकशी करा. १३) काहीजण आपली महत्त्वाची माहिती, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पासपोर्ट व अन्य आपल्या मोबाईलवर स्टोअर करतात. असे करणे चुकीचे व आर्थिक नुकसान करणारे ठरू शकते. १४) ‘ब्ल्यू टूथ’ हा सहसा सार्वजनिक जागी वापरू नका. कारण तिथे तुमची खाजगी महत्त्वाची असलेली माहिती ट्रान्स्फर होऊ शकते.

मोबाईलवरून बँकिंग व्यवहार करणे जरी सोयीचे असले तरी एकप्रकारे ते फार जोखमीचेही आहे. त्यामुळे अतिसावधानता ही बाळगायलाच हवी. पारंपरिक बँकिंगपासून आपण आता अत्याधुनिक बँकिंगचा प्रवास करताना या प्रवासात धक्के बसण्याची शक्यता आहे. पण या धक्क्यांतून सावरण्यासाठी हलगर्जीपणा बिल्कुल असता कामा नये.

इंटरनेट बँकिंग
बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. आर्थिक सुधारणांच्या योजना व त्यांची अंमलबजावणी बँकिंग क्षेत्रामार्फत होते. पूर्वी बँकिंग (अजूनही) हा वेळखाऊ व्यवसाय होता. खात्यातून रक्कम काढायची झाली तरी त्या बँकेच्या शाखेत जावे लागे. संगणकीकरणापूर्वी ज्या बँकेच्या ज्या शाखेत खाते आहे त्या शाखेतच जावे लागे. पण आता संगणकीकरणाने सर्व बँका जोडल्या गेल्या असल्यामुळे कुठेही व कुठल्याही शाखेत व्यवहार करता येतात. बँकेत रोख रक्कम काढण्यासाठी चेक किंवा ‘विथड्रॉवल स्लीप’ भरून, टोकन देणार्‍या काऊंटरवर देऊन, तेथून पितळी टोकन घ्यावे लागे. त्या टोकनवर नंबर असे. टोकन नंबर पुकारून रोखपाल कधी रक्कम घ्यायला बोलवतो याची वाट पाहावी लागे. डिजिटल क्रांतीमुळे हे चित्र बरेच बदललेले आहे. एटीएमने भारतात प्रवेश केला तशी या यंत्रातून कुठूनही बँक ग्राहकाला त्याच्या खात्यातील रक्कम मिळू लागली. डिजिटल बँकिंग कागदविरहित असल्यामुळे पर्यावरणाचा तोल सांभाळला जातो. डिजिटल बँकिंगमुळे ग्राहक अत्यंत वेगवान, सहज व सुलभतेने व्यवहार करू शकतात. डिजिटल बँकिंग म्हणजे पर्यायाने इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग! भारतात सर्वप्रथम इंटरनेट बँकिंग सुविधा पुरविणारी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक. या बँकेने सर्वप्रथम १९९६ मध्ये इंटरनेट बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. आता २६ वर्षांनंतर बहुतेक बँका ऑनलाईन बँकिंग सुविधा ग्राहकाला पुरवीत आहेत. चेकचे ‘एनकोडिंग’ करणे ही या क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाची सुरुवात.

आता खात्यातील शिल्लक जाणून घेणे, निधी ट्रान्स्फर करणे, पैसे भरणे वा काढणे, पासबूक बाळगणे/भरणे ही अशी कामे बँकेत न जाता हातातल्या मोबाईलवरून कुठूनही करता येतात. रोख रक्कम व चेक भरण्यासाठी काही बँकांनी मशीन बसविली आहेत. पासबूक भरून घेण्यासाठी बँकांमध्ये मशीन आहेत. पैसे काढण्यासाठी मशीन आहे. त्यामुळे ग्राहकाला शाखेत जाऊन कोणाही कर्मचार्‍याशी संपर्क न साधता हे व्यवहार करता येऊ शकतात. ‘कॅशियर’च्या सोयीसाठी कॅश सॉर्टिंग मशीनही येऊ शकतात. ‘कॅशियर’च्या सोयीसाठी कॅश सॉर्टिंग मशीनही बँकांत उपलब्ध असतात. चेक तपासणीकरिता ‘डिजिटल लॅम्प’ ही सुविधा असते. डिजिटल बँकिंगची काही ठळक उदाहरणे द्यायची तर- इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, वॉलेट बँकिंग, ग्राहक सेवा, डिजिटल कॅश, एटीएम, एसएमएस व आर.व्ही.आर. (इंटरनेट व्हॉईस रिस्पॉन्स) कॉलिंग आदी होत.

डिजिटल बँकिंगचे फायदे
अ) कमीत कमी वेळ. ब) कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळी बँकेचे खाते तपासता येते. क) सुरक्षित व रोकडविरहित व्यवहार.
बँकांकडे असलेल्या संगणकीकरण सीबीएस प्रणालीमुळे ग्राहक कुठूनही खात्यात उलाढाल करू शकतो. एनईएफडी/आरटीजीएस या सुविधांमुळे पूर्वीसारखे डिमांड ड्राफ्ट घेणे जवळजवळ बंद झाले आहे. एनईएफटी/आरटीजीएसमुळे ज्याच्या खात्यात पैस जमा करायचे आहेत त्याच्या खात्यात ते त्याच दिवशी जमा होतात. एनईएफटी/आरटीजीएस वापरासाठी अकरा डिजिटल अल्फान्युमरिक (शब्द व संख्या दोन्ही) कोड वापरला जातो. यातील पहिली चार अक्षरे ही बँकेच्या नावासाठी वापरली जातात. पाचवे शून्य असते आणि अंतिम सहा अक्षरे ही त्या बँकेच्या शाखेची दर्शक असतात. एनपीसीआय ही रिटेल पेमेन्ट सिस्टीमसाठी काम करते. यूपीआय ही तात्काळ मनी ट्रान्स्फर करणारी सिस्टिम असून, दोन व्यक्तींच्या बँक खात्यात व्यवहार करण्यासाठी मुख्यत्वे वापरली जाते. एकंदरीत बँकिंग क्षेत्रातील सर्व स्तरांवर अत्यंत तीव्रतेने बदल होत आहेत. डिजिटल बँकिंग हे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, सायबर बँकिंग, होम बँकिंग किंवा आभासी बँकिंग या नावानेही ओळखले जाते. यामध्ये विविध बँकिंग उपक्रमांचा समावेश आहे, जे कुठूनही वापरता येतात.

डिजिटल बँकिंगचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, जे दुर्लक्षून चालणार नाहीत. इंटरनेट (आंतरजाल) द्वारा आपल्या खात्याची सर्व माहिती हॅक केली जाऊ शकते. आपल्या मोबाईलवर विविध प्रकारचे संदेश येतात. यांस आपण प्रतिसाद दिला तर एका क्षणात आपले खाते रिकामे होऊ शकते. यासाठी असे संदिग्ध संदेश तात्काळ डिलिट करायचे किंवा संभाषण बंद करावे तसेच तो क्रमांक तात्काळ ब्लॉक करावा. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. पासवर्डची गुप्तता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपली बँकिंगची माहिती विविध उपकरणांद्वारे पसरू शकते. जशा सोयी निर्माण होतात, त्यापाठोपाठ त्यांचे दुष्परिणामही येतात. आपण त्याचा वापर कसा करणार आहोत यावर सर्व अवलंबून आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र अतिशय संवेदनशील झाले आहे. डिजिटल इंडिया पाठोपाठ डिजिटल बँकिंग फोफावत आहे. पण त्याचबरोबर मागच्या दाराने त्याचे तोटे वेगाने आत शिरत आहेत याचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. डिजिटल दुनियेत आपण सुसाट वेगाने धावत आहोत. हा वेग जगाला कुठे घेऊन जाईल हे भविष्यातच समजेल. ग्राहकांनी मात्र बँकेसारख्या संवेदनशील क्षेत्रात या डिजिटल तंत्राचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
आपल्या मोबाईलवर असलेल्या ऍॅप्सचा (ऍप्लीकेशन्स) वापर करणे ही बाब आता आपल्याला सवयीची होऊन गेलेली आहे. संगीत ऐकायला, शेअर बाजारचे भाव बघायला, रेल्वेचे तिकीट काढायला, ऑनलाईन खरेदी करायला, सिनेमाची तिकिटे काढायला व अन्य इतर गोष्टींसाठी ‘ऍप’चा खूप वापर होतो. तसेच सर्व बँकांनी आपली ‘ऍप्स’ विकसित करून खातेदारांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस इंटरनेटचा, म्हणजेच माहितीच्या महाजालाचा वापर जगभरात झपाट्याने वाढू लागला. पहिल्यांदा मोबाईल फोन आले, थोड्याच वर्षांत तंत्रज्ञानात अधिक प्रगती झाली व स्मार्ट फोन आले. आज भारतात सुमारे ६० कोटींहून अधिक स्मार्टफोन वापरात आहेत.
जनधन योजनेमुळे आता बहुसंख्य भारतीयांकडे स्वतःचे बँक खाते आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा वापरही वाढला आहे. मोबाईल फोनवरून इंटरनेट व बँकिंग सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परवडणारे इंटरनेट, स्मार्ट फोन व बँकिंग ऍप्स या तीन बाबी एकत्र आल्याने बँक जणू सर्वसामान्यांच्या हातातच आली आहे.

‘ऍप’ म्हणजे नक्की काय असते? ऍप म्हणजे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो. आपले खाते असलेल्या बँकेचे ऍप आपण मोबाईलवर घेतो ज्याला आपण ‘डाऊनलोड’ केले असे म्हणतो. तेव्हा बँकिंग सेवा त्या मोबाईल ऍपद्वारे आपल्याला उपलब्ध होतात. ऍपचा उपयोग करून खात्यात किती रक्कम आहे, आपल्या खात्यातून अन्य कुणाला पैसे पाठविणे, युटीलिटी बिल भरणे, कर भरणे, नवीन चेक बूक मागविणे, मर्चंट बँकिंग व्यवहार करणे, विमा, म्युच्युअल वगैरेंची रक्कम भरणे, बचत खात्यातील रक्कम मुदत ठेवीत वळती करणे इत्यादी व्यवहार करता येतात. सर्व बँकांचे ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये ‘प्ले स्टोर’मध्ये उपलब्ध असतात. बँकेतील खाते ‘ऍक्टिव्ह’ असावे लागते. मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडलेला असावा लागतो. बँकेच्या व्यवहारांसाठी योग्य काळजी घेऊन ऍप्सचा उपयोग केल्यास आपली खूप सोय होते व वेळ आणि श्रम यांची बचतदेखील होते!