Home बातम्या डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ

डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ

0

राज्यात डिजिटल पद्धतीच्या जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याला कालपासून प्रारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑनलाइन पद्धतीने आपले स्व-नोंदणीपत्र सादर केले.
जनगणना ही महत्त्वाची आहे. नियोजन आणि प्रशासनासाठी जनगणना आवश्यक आहे. राज्यातील नागरिकांनी येत्या 15 एप्रिलपूर्वी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात स्व-नोंदणीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केले.

स्व-गणना प्रक्रिया ही सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणना उपक्रमाचा एक भाग आहे. नागरिक आपला तपशील ऑनलाइन सादर करू शकतात. ही ऑनलाइन नोंदणी येत्या 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 16 एप्रिलपासून गणक घरांची यादी आणि गृहगणनेसाठी घरोघरी भेट देतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

जनगणना ही आकडेवारी नसून सुशासनाचा पाया ः मुख्यमंत्री

ाज्यातील सर्वांगीण विकासासाठी अचूक माहितीचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘जनगणना 2027′ अंतर्गत स्व-नोंदणी मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी नसून सुशासनाचा भक्कम पाया असल्याचे नमूद केले. राज्यातील विविध कल्याणकारी योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी अचूक व समावेशक माहिती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जनगणनेद्वारे मिळणारी माहिती भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतःची माहिती योग्य प्रकारे नोंदवणे गरजेचे आहे असे सांगून या उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास गरजा व अपेक्षा प्रतिबिंबित करणारी धोरणे आखता येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.