डरमॅटायटीस भाग २

0
703
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    म्हापसा

बरेचदा हा त्वचाविकार हळूहळू उत्पन्न होतो व वाढत जातो. पण काही अवस्थांमध्ये अर्थात एखाद्या वस्तूची तीव्र ऍलर्जी असेल तर हा अचानक उत्पन्न होऊन भरभर वाढतो. ह्याची लक्षणे स्वरूप हे प्रत्यक्ष पाहता वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात आढळू शकते.

आता ह्या भागात आपण डरमॅटायटीस ह्याविषयी थोडी आयुर्वेदातील माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये डरमॅटायटीस ह्या नावाचा व्याधी आढळत नाही. पण अर्वाचीन शास्त्रामधील डरमॅटायटीस ह्या व्याधीशी साम्य असणारी अनेक लक्षणे आयुर्वेदामध्ये उल्लेख असलेल्या अनेक त्वचाविकारात आढळून येतात. ह्या भागात आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये प्रमेह (अर्थात अर्वाचीन शास्त्रामधील मधुमेह ह्या व्याधीशी हा साम्य दर्शवितो) ह्या व्याधीचे जे उपद्रव सांगितले आहेत त्यांना प्रमेह पिडका असे म्हणतात त्यामधील काही प्रकार हे डरमेटायटीस ह्या व्याधी सारखे लक्षणे दिसणारे आढळतात. तर आपण प्रथम त्यांची माहिती पाहूयात.

तर ह्या प्रमेह पिडकांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत :
१) शराविका : ह्यात कडा उंच आणि मध्यभागी खोलगट अशा पुळ्या येतात.
२) सर्षपिका : पांढर्‍या मोहरीसारख्या दिसणार्‍या व तशाच आकाराच्या पुळ्या येतात.
३) काच्छपिका : जळजळ उत्पन्न करणार्‍या कासवाच्या पाठीप्रमाणे असणार्‍या पुळ्या.
४) जालिनी :
ह्या पुळ्या पोटावर अथवा पाठीवर येतात. ह्या पुष्कळ जळजळ उत्पन्न करतात व मांस आणि सिराजाल ह्यांनी युक्त ह्या पुळ्या असतात. ह्यात ठणका फार असतो व ओलसरपणा असतो.
५) विनता व पुत्रिणी : मोठ्या निळ्या रंगाच्या पुळ्यांना विनता असे म्हणतात तर मध्ये मोठी पुळी असून तिच्या भोवताली बारीक बारीक पुष्कळ पुळ्या असतात तिला पुत्रिणी असे म्हणतात.
६) मसुरिका : ही मसूर डाळीच्या आकाराची असते.
७) अलजी : ही पुळी काळसर तांबूस फोडांनी युक्त असते.

आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या क्षुद्र रोगामध्येदेखील त्वचेशी संबंधित काही विकार आढळतात त्याची माहिती इथे पहाणे आवश्यक आहे:
१) अजगल्लिका : लहान मुलांना कफ व वात ह्या दोषांपासून न दुखणार्‍या अंगाच्या वर्णाच्या स्निग्ध अशा पुळ्या येतात.
२) यवप्रख्या : कफ वातापासून जवासारख्या मांसाच्या आश्रयाने होणार्‍या अतिशय कठीण अशा ह्या पुळ्या असतात.
३) अंधालजी : कठीण मुख नसणार्‍या वर उचललेल्या गोलाकार अशा ह्या पुळ्या ज्यातून थोडा पु देखील निघतो.
४) विवृता : पित्तामुळे उत्पन्न होणार्‍या पिकलेल्या उंबराच्या फळाप्रमाणे दिसणार्‍या गोल, दाहयुक्त पसरट तोंडाच्या पुळ्या.
५) इंद्र्‌वृद्धा : वात पित्तापासून कमळातील केसराप्रमाणे मध्ये एक पुळी येते व तिच्यावर अन्य बारीबारिक पुळ्या येतात.
६) गर्दभिका :
वातपित्तामुळे वर उचललेल्या ताम्बुसलाल बारीक बारीक पुळ्या युक्त मंडल अंगावर उठतात ज्यात फार ठणका असतो.
७) चिप्प्य : वात व पित्त हे दोष माणसाच्या नखाच्या दोषातील आश्रयाने त्या ठिकाणी दाह उत्पन्न करतात ज्यामुळे नख पिकते.
८) पाददारी :
नेहमी पायी प्रवास करणार्‍या माणसाच्या दोन्ही पायातील वात प्रकुपित होऊन पायाला रुक्षपणा आणतो त्यामुळे पायाच्या तळव्यांना भेगा पडतात व ते ठणकतात.
९) अलस : घाणेरड्या चिखलातून हिंडल्याने पायाच्या बोटांमध्ये ओलसरपणा होतो व त्या ठिकाणी कंड सुटून आग होते व ठणका लागतो.
१०) दारुणा : कफ वातापासून केस येण्याची जागा कठीण होऊन खाजते व ती रुक्ष होऊन तिथे भेगा पडतात.
११) अरुंशिका : कफ, रक्त व डोक्यामधील कृमी अर्थात ज्या सूक्ष्म अशा असून त्वचेवर असतात त्या त्याठिकाणी सूक्ष्म व्रण होतात ज्यात पुष्कळ बारीक छिद्र असून त्यातून लस वाहते.
१२) यौवनपिटिका : कफ, वात व रक्त ह्यापासून सावरीच्या काट्यासारख्या पुळ्या तारुण्यात माणसाच्या तोंडावर येतात.
१३) अहिपुतना :
लहान मुलांना संडास व लघवीच्या जागी जर ती जागा नीट साफ केली नाही अथवा घामाने तो भाग सतत ओलसर राहिल्याने खाज येवून फोड येतात व त्यातून लस वाहते. पुढे ते फोड फुटून त्याचे व्रण होतात.

ह्या प्रत्येक प्रकारामध्ये वात- पित्त- कफ हे त्रिदोष, रक्त, मेद ह्यांची दुष्टी आढळून येते. वात दोषाच्या प्रकोपाने उत्पन्न होणार्‍या पुळ्या ह्या बारीक काळसर वर्णाच्या रुक्ष असून त्यामधून स्त्राव होत नाही. ज्या पुळ्या पित्तामुळे उत्पन्न होतात त्या मध्यम आकाराच्या, लालसर… बरेचदा ह्यात पु उत्पन्न होतो. त्या भागात आग होते व त्या भरभर वाढतात. कफामुळे उत्पन्न होणार्‍या पुळ्या ह्या पांढर्‍या वर्णाच्या, आकाराने मोठ्या व त्यात पु स्त्राव होतो व भरपूर खाज येते.
बरेचदा हा त्वचाविकार हळूहळू उत्पन्न होतो व वाढत जातो. पण काही अवस्थांमध्ये अर्थात एखाद्या वस्तूची तीव्र ऍलर्जी असेल तर हा अचानक उत्पन्न होऊन भरभर वाढतो. ह्याची लक्षणे स्वरूप हे प्रत्यक्ष पाहता वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात आढळू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्याची लक्षणे समान असतील असे सांगता येत नाही.
आता आपण ह्या त्वचाविकारात कोणते पथ्य पाळावे व काय उपचार आयुर्वेदानुसार केले जातात ते पाहूयात.

* प्रथम आहारात मांसाहार, तिखट. तेलकट, बेकरीचे पदार्थ, खारट, आंबट, आंबवलेले पदार्थ, सर्व प्रकारचे चुकीचे अन्नसंयोग हे वर्ज्य करावेत. आपली दिनचर्या ही व्यवस्थित असावी. वेळेत जेवावे, खावे, मानसिक ताणापासून लांब राहावे.
आयुर्वेदातील उपचारांमध्ये पंचकर्मातील वमन, विरेचन, रक्तमोक्षण, तसेच विविध लेप ह्यांचा उपयोग होतो. वनस्पतीज औषधामध्ये खदिर, सारिवा, मंजीष्ठा, निंब, गुळवेल, हळद, कुष्ठ, वाळा, जेष्ठमध, हे उपयुक्त आहेत. तर कल्पांमध्ये आरोग्यवर्धिनी, गंधकरसायन, सक्ष्म त्रिफळा, पंचातीक्तक हरीत गुग्गुळ, रक्त पाचक, मांस पाचक, मेदोपाचक हे उपयुक्त आहेत. तर असाव अरीष्टांमध्ये मंजिष्ठादि क्वाथ, सारीवाद्यासव, उशिरासव, चंदनासव, दशमूलारिष्ट, शिरीशारीष्ट हे उपयुक्त आहेत.
(वर उल्लेख केलेली औषधे ही फक्त वाचकांच्या माहितीकरिता आहेत त्याचा वापर फक्त वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा ही विनंती).