बांधकाम क्षेत्रातील एका ठेकेदाराने 2 कोटी रुपयाची खंडणी न दिल्याने त्याला रस्त्यात अडवून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून फातोर्डा पोलिसांनी कुख्यात गुंड वॉल्टर फर्नांडिस याच्यासह चार जणांना काल अटक केली.
वॉल्टर फर्नांडिस हा कुख्यात गुंड असून, 12 ऑगस्ट रोजी पहाटे ज्या टोळीतील दोघा तरुणांवर हल्ला झाला होता, त्या वॉल्टर टोळीचा तो म्होरक्या आहे. या टोळीकडून कुख्यात गुंड विजय कुलाल व इम्रान बेपारी या दोघांना मारहाण झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मुंगुल येथे कार अडवत त्यात वॉल्टर असल्याच्या संशयावरून गोळीबार झाला होता. पण त्यावेळी कारमध्ये वॉल्टर सापडला नव्हता.
श्रीनिवास थोरवात हे अंबिका रियल इस्टेटचा व्यवस्थापकीय भागीदार असून, त्यांनी वॉल्टरविरुद्ध फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. दि 14 ऑगस्ट रोजी चौगुले कॉलेजजवळ येथे वॉल्टर फर्नांडिस (रा. राय), तिरुपती वारकुरी (रा. मडगाव), रोहित फळदेसाई (रा. फातोर्डा), विनोद कुमार टोताड (रा. कुडतरी) या चौघांनी बळजबरीने तक्रारदाराला अडवून मारहाण केली. तसेच 2 कोटी रुपये खंडणी मागून ती न दिल्यास मुलाबाळांसह त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी वरील चौघांनी बाणावली येथे बांधकामाच्या जागी जाऊन श्रीनिवास यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र खंडणी न दिल्याने हा हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते.