ट्रकमालक-सेझादरम्यान खनिज वाहतूक दरांबाबत सहमती

0
116

अखेर खाण वाहतुकीतील दरवाढीसाठी चालू असलेल्या समस्येवर काल दि. २३ रोजी ५२ रु. डिझेल प्रती लिटर व वाहतुक दर १२ रुपये असा तोडगा काढण्यात आला. हा दर मान्य असल्याचे ट्रक मालकांनी सांगितले.
काल दुपारी तीन वाजता सावर्डेचे आमदार दीपक पावसकर यांच्या कार्यालयात सेझा गोवा कंपनीचे अधिकारी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, सांगेचे आमदार प्रसाद गावकर, सेझा गोवाचे जोसेफ कुएलो, वेदांताचे विजयकुमार, रामसावंत, डि. व्ही. पवार, वल्लभ दळवी, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, बालाजी गावस आदी उपस्थित होते.सुमारे चार तासांच्या चर्चेनंतर वरील दरनिश्‍चिती मान्य असल्याचे सेझा गोवा कंपनीने लेखी आश्‍वासनाद्वारे स्पष्ट केले.

त्यानंतर बाकीच्या कंपन्यांनाही असे लेखी निवेदन दिल्याशिवाय वाहतूक करू देणार नसल्याचे आमदार पावसकर व आमदार काब्राल यानी सांगितले. काल सकाळी कुडचडेतील रविंद्र भवनात याविषयी एक बैठक घेण्यात आली होती. व त्यावेळी दर वाढवल्याशिवाय किंवा डिझेलचा प्रस्तावित दर दिल्याशिवाय वाहतुक सुरू करणार नाही यावर ट्रकमालक ठाम राहिले होते.

त्यानंतर तिन्ही आमदार व संबंधित अधिकार्‍यांनी दुपारी बैठक बोलावून दरासंबंधी चर्चा केली. आधी ही कंपनी डिझेल ५५ व वाहतुक दर १२ या दरावरच अडून बसली होती. व पुन्हा पुन्हा दरासंबंधी ट्रकमालकांना विचारणा होत होती. पण ट्रकमालक आपल्या मागणीवर ठार राहिले. आमदार काब्राल पावसकर व प्रसाद गावकर या तीन्ही आमदारांनी त्यानंतर कंपनीकडे व्यवस्थित मुद्दा मांडून तोडगा काढण्याची विनंती केली. शेवटी चार तासांच्या चर्चेनंतर कंपनीने हा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगितले. दर तीन महिन्यांनी बाजारातील परिस्थितीचे निरीक्षण करून दरासंबंधी पुनर्विचार करण्यात येणार असल्याचेही आमदारांनी यावेळी सांगितले. आमदार काब्राल यांनीही कंपनी तसेच ट्रकमालकांनाही धन्यवाद दिले. प्रसाद गावकर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. आज शुक्रवारी सेझा गोवा कंपनीने सकाळी ११ वा. महापूजा आयोजित केली असून त्यानंतर शनिवारपासून ही वाहतूक सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. ट्रकमालकांनी या निर्णयाचे स्वागत केले.