ट्रकच्या धडकेने फोंड्यात दुचाकीस्वार जागीच ठार

0
147

कुर्टी येथील आमीगोस हॉटेल समोरील जंक्शनवर रविवारी रात्री ८.१५ वा. सुमारास मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात देवेंद्र प्रितम पार्सेकर (२५, सीमेपायण-म्हार्दोळ) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याची आई प्रतिमा पार्सेकर (४५) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०५-एच-०९४७ क्रमांकाच्या दुचाकीने देवेंद्र व त्याची आई कुर्टीहून बेतोडा बगल रस्त्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी उसगावहून बेतोडा बगल रस्त्याच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू ट्रकने दुचाकीला कुर्टी जंक्शनवर धडक दिली. यामुळे दुचाकीवरील आई व मुलगा दुचाकीसह रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना उपजिल्हा इस्पितळात नेत असताना देवेंद्र पार्सेकर याचा वाटेत मृत्यू झाला. हा अपघात घडला तेव्हा मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते.

फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजीत उमर्ये यांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघात प्रकरणी ट्रकचालक राजेश्‍वर महेंद्र प्रसाद (२७, बनारस-उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल सकाळी गोमेकॉत उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.