ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार

0
126

मडकई-कुंडई बगल रस्त्यावर काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात संयमी वामन नाईक रायकर (४२, महालवाडा-मडकई) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाने वाहनासह तेथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए- ०८- एजे- १८४३ क्रमांकाची सिडी डॉन ही दुचाकी घेवून संयमी नाईक रायकर मडकईतून कुंडई येथे जात होता. एका वळणावर दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला तर दुचाकी १५ मिटर अंतर पुढे जावून रस्त्याच्या मध्यभागी स्थिरावली. त्याचवेळी विरुध्द दिशेने येणार्‍या अज्ञात वाहनचालकाने घसरून पडलेल्या दुचाकीस्वराला वाचविण्यासाठी ट्रक रस्त्याच्या बाजूला वळविला. मात्र रस्त्याच्या बाजूला फेकला गेलेल्या दुचाकीस्वराच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सदर अज्ञात ट्रक रस्त्याच्या बाजूला गेल्याचा खुणा अपघातस्थळी दिसून आल्या. फोंडा पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी अपघातस्थळी जावून पंचनामा केला. पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. फोंडा पोलीस अज्ञात ट्रकाचा शोध घेत आहेत तसेच ग्रामस्थांनी मडकई औद्योगिक वसाहतीत जावून अनेक ट्रकांची तपासणी केली. मृत झालेला संयमी नाईक रायकर हा बांधकाम खात्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागात नोकरीस होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून त्याची पत्नी एका पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत आहे.