टॅक्सीप्रश्‍न तोडग्यासाठी सोमवारी बैठक

0
138

‘गोवा माईल्स’ या ऍपधारीत टॅक्सी सेवेला विरोध करीत ‘गोवा माईल्स’मध्ये सहभागी होण्यास गोमंतकीय टॅक्सीवाल्यांनी दिलेला नकार व गोवा माईल्स टॅक्सी विरोधी संबंधित टॅक्सीवाले व गोमंतकीय टॅक्सीचालक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला वाद यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परवा सोमवार दि. १ जुलै रोजी एक विशेष बैठक बोलावली आहे. ही माहिती कळंगुटचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
उत्तर गोव्यात गोमंतकीय टॅक्सी मालकांच्या दोन संघटना आहेत. या दोन्ही संघटना तसेच दक्षिण गोव्यातील टॅक्सी मालकांची संघटना तसेच सर्व किनारपट्टी मतदारसंघांतील आमदारांना या बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती लोबो यांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून गोवा माईल्स व स्थानिक टॅक्सीमालक यांच्यात कित्येक वेळा भांडणे झाली. तसेच याप्रश्‍नी स्थानिक टॅक्सी मालकांच्या पणजी, हणजुण आदी ठिकाणी बैठका झाल्या. रविवारी कळंगुट येथे बैठक होणार असल्याचे लोबो म्हणाले. सर्व टॅक्सी मालकांनी तसेच किनारपट्टी भागातील आमदारांनी या बैठकीला हजर राहून तोडगा काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी लोबो यांनी केले.

स्थानिकांची ऍपधारीत टॅक्सीसेवा हवी : लोबो
गोवा माईल्स ही राज्याबाहेरील कंपनीची ऍपधारीत टॅक्सीसेवा आहे. त्यामुळे या सेवेला गोमंतकीय टॅक्सी मालकांचा विरोध आहे, असे मायकल लोबो म्हणाले व गोमंतकीयांची स्वतःची ऍपधारीत टॅक्सीसेवा हवी असल्याचे ते म्हणाले. राज्यात सुमारे १० हजार युवक टॅक्सी व्यवसायांमध्ये आहेत. त्यांना गोव्याची ऍपधारीत टॅक्सी सेवा हवी आहे. बाहेरच्या कंपनीबरोबर काम करायला ते तयार नसल्याचे लोबो म्हणाले.