‘टू फिंगर टेस्ट’ वर बंदी

0
26

बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणार्‍या (टू फिंगर टेस्ट अर्थात कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच अशा प्रकारची चाचणी करणार्‍यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जाते हे निंदनीय आहे, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली.

लैंगिकदृष्ट्या सक्रिय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही, या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे; पण सत्यापेक्षा मोठे काही नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले. यावेळी न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बलात्कार आणि लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी घेतली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा आदेश दिला आहे.