गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४२ वर

0
7

>> १७० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश; पंतप्रधान आज घटनास्थळाला भेट देणार

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल रविवारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी मोरबी येथे जाणार आहेत.

या भागात येणार्‍या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता; मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले होते की नव्हते, याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे मोरबी पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. तसेच अनेक जण छट पूजा साजरी करण्यासाठी आले होते. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पुलावर जाण्यासाठी नागरिकांना १७ रुपये, तर लहान मुलांना १२ रुपये तिकिट आकारण्यात येत होते.

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत १४२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे चारशेहून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच आतापर्यंत १७० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

या दुर्घटनेनंतर नौदलाच्या ५० कर्मचार्‍यांसह एनडीआरएफ, हवाई दलाच्या जवानांना बचाव मोहीम राबवली. तसेच राजकोट सिव्हिल रुग्णलयात एक विशेष विभाग या दुर्घटनेतील लोकांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पूल दुर्घटनेप्रकरणी ९ जणांना अटक
या प्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली असून, या पुलाचे नुतनीकरण करणार्‍या एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या पुलाचे नुतनीकरण ओरेव्हा या कंपनीने केले होते. सदर कंपनीचे कंत्राटदार पिता-पुत्र, दोन कर्मचारी, तीन सुरक्षा रक्षक व पुलावर तिकिट विक्री करणार्‍या दोघांना अटक केली आहे.

ऍक्ट ऑफ गॉड’ नव्हे, ऍक्ट ऑफ फ्रॉड;
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘ते’ भाषण व्हायरल

पश्‍चिम बंगालमधील २०१६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसांअगोदर एक पूल कोसळला होता. या घटनेनंतर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर टीका करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूल पडल्याची घटना म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’ नाही, तर ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ आहे. हा ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’चा परिणाम आहे, असे म्हटले होते. निवडणुकीच्या दरम्यान हा पूल पडणे खरे तर काही प्रमाणात ‘ऍक्ट ऑफ गॉड’ आहे. कारण त्यांनी (तृणमूल कॉंग्रेस) कसे सरकार चालवले हे माहीत व्हावे, यासाठी हा देवाचा संदेश आहे, अशी टीका मोदींनी या व्हिडीओत केली आहे. हाच व्हिडिओ आता मोरबी पूल दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मोरबी पूल दुर्घटनाही ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ आहे का, असा सवाल करत विरोधकांकडून मोदींना लक्ष्य केले जात आहे.