टी-२० विश्‍वचषकातील थरारक मुकाबले

0
145
  •  सुधाकर नाईक

कोरोनाच्या कहरामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. क्रीडापटू तसेच क्रीडाशौकिनांतही नैराश्य पसरले आहे. या एकंदर पार्श्‍वभूमीवर टी-२० विश्‍वचषक क्रिकेटमधील काही उत्कंठावर्धक, धक्कादायक मुकाबल्यांचा आढावा घेत हे निराशामय क्षण दूर करण्याचा प्रयत्न करू…

‘कोविड-१९’ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अखेर प्रतिष्ठेच्या आयसीसी विश्‍वचषक टी-२० स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या प्रतिष्ठेच्या द्वैवार्षिक प्रतियोगितेचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात येणार होते, पण ‘कोविड-१९’ महामारीचा कहर संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने आयसीसीला नाईलाजाने हा निर्णय घेणे भाग पडले. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका सुरू झाल्याने टी-२० विश्‍वचषकाचा थरार किमान छोट्या पडद्यावर पाहायला मिळेल अशी क्रिकेटशौकिनांची अपेक्षा होती, पण कोरोना विषाणूचे संक्रमण थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने आयसीसीला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. आगामी प्रतियोगिता कोठे होईल याबाबत कोणतीही घोषणा आयसीसीने केलेली नाही. एकंदर परिस्थितीचे अवलोकन करूनच आयसीसी पुढील निर्णय घेईल.
कोरोनाच्या कहरामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले असून जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. क्रीडाजगतही यातून सुटलेले नसल्याने क्रीडापटू तसेच क्रीडाशौकिनांतही नैराश्य पसरले आहे. या एकंदर पार्श्‍वभूमीवर टी-२० विश्‍वचषक क्रिकेटमधील काही उत्कंठावर्धक, धक्कादायक मुकाबल्यांचा आढावा घेत हे निराशामय क्षण दूर करण्याचा प्रयत्न करूया…

२००७ : ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे : २००३ मधील झिम्बाब्वेतील राजकीय अस्थैर्याचा तेथील क्रिकेटवर विदारक परिणाम घडला होता. बहुसंख्य अव्वल क्रिकेटपटूंनी विजनवास पत्करला होता. त्याच वर्षी झालेल्या विश्‍वचषकात झिम्बाब्वेला एकही सामना जिंकता आला नव्हता, त्यामुळे शुभारंभी टी-२० विश्‍वचषकातील पहिल्या साखळी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेविरुध्द एकतर्फी, सहजसुंदर विजय मिळवील अशी सर्वांची अटकळ होती. या लढतीत ऑस्ट्रेलियाला ५०:१ असे ‘फेवरिट’ संबोधले जात होते. पण युवा दमाच्या झिम्बाब्वेने सर्वांच्या अटकळीना तडा देत, प्रभावकारी गोलंदाजीत, प्रथम फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाला १३८ धावांवर रोखले. अँड्र्यू सायमंडस आणि ब्रॅड हॉग या दोघांनाच तिशी ओलांडता आली. झिम्बाब्वेचा कर्णधार प्रॉस्पर उत्सेयाने उपलब्ध मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजांचा सुरेख वापर करीत ऑसिस फलंदाजांवर अंकुश राखला. प्रत्युत्तरात ब्रँडन टेलरच्या ४५ चेंडूंवरील नाबाद ६० धावांवर झिम्बाब्वेने चार वेळच्या विश्‍वचषक विजेत्यांवर पाच गडी तथा १ चेंडू राखून सनसनाटी विजय प्राप्त केला. अखेरच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी १२ धावांची गरज होती. टेलरने पहिलाच चेंडू स्वीपद्वारे सीमापार केला. शेवटच्या दोन चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज होती आणि सुदैवाने अंतिमपूर्व चेंडू टेलरच्या पॅडला चाटीत सीमापार गेला आणि झिम्बाब्वेच्या ‘डगआउट’मध्ये विजयोत्सावाला उधाण आले!

२००७ : भारत वि. पाकिस्तान अंतिम लढत : टी-२० विश्‍वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा गट पातळीवरील ‘टाय’ मुकाबला ‘सुपर ओव्हर’मध्ये जिंकलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील युवा दमाच्या भारतीय संघाची गाठ अंतिम फेरीत पुन्हा आशियाई पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशीच पडली. जोहान्सबर्ग येथील वॉंडर्स मैदानावरील या उत्कंठावर्धक अंतिम मुकाबल्यात सलामीवीर गौतम गंभीरच्या बहुमूल्य ७५ आणि रोहित शर्माच्या तडाखेबंद ३० धावांवर भारताने प्रथम फलंदाजीत १५७ धावांचे आव्हान खडे केले. प्राथमिक फेरीतील पराभवाचा वचपा घेण्याच्या इराद्याने पाकने खेळास दमदार प्रारंभ केला. इम्रान ताहीरने १४ चेंडूंत ३० धावा चोपीत आक्रमक सुरुवात केली. रॉबिन उथप्पाच्या अचूक फेकीवर तो धावचित झाला. नंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना धक्के देण्यास प्रारंभ केला, पण मिसबाह उल हकने एक बाजू लावून धरली होती आणि पाकच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या होत्या. पण हातात केवळ एक विकेट शेष होती. कर्णधार धोनीने अंतिम षटकात उमद्या जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपविला. मीसबाहने दुसर्‍याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला. पाकला शेवटच्या चार चेंडूत केवळ सहा धावांची गरज होती. पण अतिआत्मविश्‍वासी मिसबाहने जोगिंदरचा ऑफ स्टंपबाहेरील चेंडू ‘स्कूप शॉट’ खेळला आणि हवेत उडालेला चेंडू शॉर्ट फाइनलेगवरील श्रीसंतने टीपला आणि धोनीच्या धुरंधरांनी पहिल्या वहिल्या टी-२० विश्‍वचषकावर भारताचे नाव कोरले. २४ सप्टेंबरला भारतीय क्रिकेट इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी रेखाटला गेला!

२००९ : इंग्लंड वि. नेदरलँड : दुसर्‍या टी-२० विश्‍वचषकातील लॉर्डसवरील या विस्मयकारी शुभारंभी मुकाबल्यात शतकी सलामीनंतरही यजमान इंग्लंडला १६२ धावांचे आव्हान खडे करता आले. नवख्या नेदरलँडची सुरुवात डळमळीत झाली पण टॉम दे ग्रथ आणि पीटर वॉरेन यांनी दांडपट्टा घुमवीत झटपट अर्धशतकी भागी रचीत धाववेग कायम राखला. स्टुअर्ट बॉडच्या अंतिम षटकात नेदरलँडला ६ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. नेदरलँडच्या फलंदाजाने चेंडू तटविला आणि सामना ‘टाय’ करण्याच्या प्रयत्नात धाव घेतली. गोलंदाजाने ‘फॉलोथ्रू’मध्ये चेंडू रोखला पण चेंडू यष्टीवर फेकण्याच्या नादात ‘स्टंप मिस’ झाला आणि या ‘ओव्हरथ्रो’वर दुसरी धावही घेत नेदरलँडसने सनसनाटी, नाट्यमय विजय प्राप्त केला.

२०१० : भारत वि. श्रीलंका : ‘सुपर एट’ स्थानासाठी श्रीलंकेला निर्णायक वा मोठ्या फरकाच्या विजयाची आवश्यकता होती. १६४ धावांच्या उद्दिष्टाच्या पाठलागातील श्रीलंकेची सुरुवात २ बाद ६ अशी डळमळीत झाली. पण तिलकरत्ने दिल्शान आणि कुमार संगकाराने डाव सावरला. नंतर अँजेलो मॅथ्यूज आणि चमरा कपुगेदरा यांनी जलद अर्धशतकी भागीत विजयाच्या आशा उंचावल्या. अंतिमपूर्व चेंडूवर मॅथ्यूज धावचित झाला. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती, पण जिगरबाज कपुगेरदराने आशिश नेहराचा चेंडू पुढे सरसावत मैदानाबाहेर टोलवीत षटकारासह बेटवासीयांचा थराराक विजय झळकविला. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार कपुगेदराने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा चोपल्या.

२०१० : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान : पाकिस्तानने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याच्या पाठलागातील ऑसिसला विजयासाठी अखेरच्या ४५ चेंडूत ८७ धावांची गरज होती. मायकल हसी आणि कॅमेरून व्हाइटने आक्रमक खेळीत पाच षटकांत ४३ धावा जोडल्या पण २१ चेंडूत ५३ धावांची गरज असताना कॅमेरून बाद झाला. मायकल हसीने नंतर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत अजमलला षटकार खेचला. हसीने नंतर १९व्या षटकात १६ धावा जमविल्या. ऑसिसला विजयासाठी अंतिम षटकात आणखी १६ धावांची गरज होती आणि जिगरबाज मायकलने तुफान दांडपट्टा घुमवीत ६, ६, ४, ६ अशा बेदरकार फटक्यांसह पाकचा विजय हिरावला. टी-२० मधील सर्वोत्तम खेळीसह हसीने केवळ २४ चेंडूत नाबाद ६० धावा फटकावीत ऑसिसला ३ गडी व १ चेंडू राखून विजय मिळवून देत प्रथमच टी-२० विश्‍वचषकाची अंतिम फेरी गाठून दिली.
२०१२ : वेस्ट इंडीज वि. न्यूझिलंड : प्राथमिक फेरीत श्रीलंकेकडून ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभूत व्हावे लागलेल्या न्यूझिलंडला चार दिवसानंतर परत एकदा पुनर्प्रत्यय अनुभवावा लागला. किविजने प्रभावी गोलंदाजीत वेस्ट इंडीजला १३९ धावांवर रोखले पण प्रत्युत्तरात त्यांचीही घसरगुंडी घडली. चार षटकांत विजयासाठी केवळ २७ धावांची गरज होती पण विस्मयकारी फिरकीपटू सुनिल नारायणने आपल्या दोन षटकांत केवळ पाच धावा देत २ बळी घेतले आणि किविज संघ दडपणात आला. रॉस टेलरच्या ६२ धावांनंतरही सामना ‘टाय’ झाला आणि अखेर ‘सुपर ओव्हर’मध्ये कॅरेबियन्सनी १८ धावांचे लक्ष्य आरामात पार करीत बाजी मारली.

२०१६ : इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका : २०१५ मधील विश्‍वचषकातील अपयशानंतर इंग्लंडने टी-२० विश्‍वचषकात कमालीची प्रगती दर्शविताना द. आफ्रिकेने दिलेले २३० धावांचे अवघड आव्हान जिगरबाजपणे पेलले. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या उत्कंठावर्धक मुकाबल्यात कार्लोसच्या अखेरच्या ‘डबल स्ट्रायक’नंतरही ज्यो रूट (४४ चेंडूत ८३) आणि जॅसन रॉय (१६ चेंडूत ४३) यांच्या दमदार फलंदाजीवर इंग्लंडने द. आफ्रिकेवर २ गडी आणि २ चेंडू राखून सनसनाटी विजय प्राप्त केला.

२०१६ : भारत वि. बांगलादेश : टी २० इन्स्टंट क्रिकेटमधील भारतीय संघाची ही मोठी ‘ग्रेट इस्केप’ होय. भारताच्या १४६ धावांच्या पाठलागातील बांगलादेशच्या मुशफिकर रहिमने अंतिम षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकीत विजय दृष्टिपथात आणला होता. त्यांना शेवटच्या तीन चेंडूत विजयासाठी केवळ २ धावांची गरज होती. भारतीय संघ स्वगृहीच्या या प्रतियोगितेत स्पर्धेंतील आव्हान संपण्याच्या सीमेवर होता. पण अंतिम क्षणातील नाट्यमय घडामोडीत रहिम आणि महमुदुल्लाह बेदरकार फटक्यांच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाले. शेवटच्या चेंडूवर शिवतुंगेंला विजयासाठी दोन धावांची गरज होती. ‘सामना टाय’ करण्याच्या प्रयत्नात शिवतुंगे धावला पण धोनीने विलक्षण चपळाईने ‘स्टंप’ उखडीत धावचित केले आणि भारतावरील पराभवाची नामुष्की टळली.

२०१६ : भारत वि. ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा आणि ऍरोन फिन्च यांच्या ४.१ षटकांतील ५१ धावांच्या सलामीवर ऑसिसने भारतापुढे १६१ धावांचे आव्हान खडे केले. प्रत्युत्तरात वीराट कोहलीच्या ५१ चेंडूवरील धुंवाधार नाबाद ८२ धावांवर भारताने ५ चेंडू राखीत उद्दिष्ट गाठले. भारताला शेवटच्या १२ चेंडूत तब्बल ४३ धावांची गरज होती. कोहलीने आक्रमक पवित्रा अवलंबित जेम्स फॉल्कनरच्या गोलंदाजीवर ४, ४, ६, २ असे फटके लगावत पारडे भारताच्या दिशेने झुकविले आणि नंतर पुढील षटकात आणखी चार चौकार ठोकीत भारताला पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला.

२०१६ : वेस्ट इंडीज वि. इंग्लंड : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवरील रोमहर्षक अंतिम मुकाबल्यात कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोकसच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकीत वेस्ट इंडीजला दुसर्‍यांदा टी-२० विश्‍वचषक अजिंक्यपद मिळवून दिले. प्रथम फलंदाजी केलेल्या इंग्लंडच्या ३ बाद २३ अशा घसरगुंडीनंतरही ज्यो रूट (३६ चेंडूत ५४) आणि जोस बटलर (२२ चेंडूत ३६) यांच्या दमदार फलंदाजीवर प्रतिस्पर्ध्यांपुढे १५५ धावांचे आव्हान खडे केले. वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल (६) स्वस्तात बाद झाला, पण मर्लोन सॅम्युएल्सने ६६ चेंडूत नाबाद ८५ धावा ठोकीत आगेकूच जारी राखली. अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती आणि कार्लोस ब्रॅथवेटने विस्मयकारी टोलेबाजीत सलग चार उत्तुंग षटकात खेचीत वेस्ट इंडीजला दुसर्‍यांदा टी-२० विश्‍वचषक अजिंक्यपदाचा मान मिळवून दिला.