टीम इंडिया मजबूत स्थितीत

0
98

>> रोहितचे पहिले कसोटी द्विशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या व शेवटच्या कसोटी सामन्यावर दुसर्‍या दिवसअखेर भारताने मजबूत पकड मिळविली आहे. पहिल्या डावात ४९७ धावा उभारल्यानंतर टीम इंडियाने पाहुण्यांची २ बाद ९ अशी केविलवाणी स्थिती केली आहे. अंधुक प्रकाशामुळे दुसर्‍या दिवशी केवळ ६८.३ षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिनी केवळ ५८ षटके पूर्ण झाली होती.

पहिल्या दिवसाच्या ३ बाद २२४ धावांवरून काल पुढे खेळताना भारताने चांगला खेळ दाखवला. अजिंक्य रहाणेने आपले ११वे कसोटी शतक पूर्ण केले. २०१६ साली इंदूर येथे शतकी वेस ओलांडल्यानंतर मायदेशातील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. रहाणेने १९२ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार व १ षटकारासह ११५ धावा केल्या. दुसर्‍या टोकाने रोहितने आपले पहिलेवहिले कसोटी द्विशतक केले. वनडेला साजेशा ८३च्या स्ट्राईकरेटने त्याने २५५ चेंडूंत २१२ धावा कुटल्या. या खेळीत २८ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. या द्वयीने चौथ्या गड्यासाठी २६७ धावांची विशाल भागीदारी रचली.

लिंडने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. रवींद्र जडेजाने आपले तेरावे कसोटी अर्धशतक ठोकताना आक्रमकतेला मुरड घालत संयमी खेळ दाखवला. प्रकाश अंधुक होत असल्याचे पाहून कोहलीने संघाचे पंचशतक फलकावर लागण्यापूर्वीच डाव घोषित केला. मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी आपापल्या पहिल्या षटकात अनुक्रमे डीन एल्गार व क्विंटन डी कॉक यांना माघारी धाडत भारताले फ्रंटफूटवर नेले. यानंतर अंधुक प्रकाशामुळे कोहलीने या दोघांची गोलंदाजी ताबडतोब बंद करताना जडेजा व नदीमला गोलंदाजीस उतरवले. परंतु, मैदानावर काळोख पसरल्याने पंचांनी दिवसाचा खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.

धावफलक
भारत पहिला डाव ः (३ बाद २२४ वरून) ः रोहित शर्मा झे. एन्गिडी गो. रबाडा २१२ (२५५ चेंडू, २८ चौकार, ६ षटकार), अजिंक्य रहाणे झे. क्लासें गो. लिंड ११५, रवींद्र जडेजा झे. क्लासें गो. लिंड ५१, वृध्दिमान साहा त्रि. गो. लिंड २४, रविचंद्रन अश्‍विन यष्टिचीत क्लासें गो. पिद १४, उमेश यादव झे. क्लासें गो. लिंड ३१, शहाबाज नदीम नाबाद १, मोहम्मद शमी नाबाद १०, अवांतर १७, एकूण ११६.३ षटकांत ९ बाद ४९७
गोलंदाजी ः कगिसो रबाडा २३-७-८५-३, लुंगी एन्गिडी २०-५-८३-०, ऍन्रिक नॉर्के २४.३-५-७९-१, जॉर्ज लिंड ३१-२-१३३-४, डॅन पिद १८-३-१०१-१
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. साहा गो. शमी ०, क्विंटन डी कॉक झे. साहा गो. यादव ४, जुबेर हमझा नाबाद ०, फाफ ड्युप्लेसी नाबाद १, अवांतर १, एकूण ५ षटकांत २ बाद ९
गोलंदाजी ः मोहम्मद शमी १-१-०-१, उमेश यादव १-०-४-१, शहाबाज नदीम २-२-०-०, रवींद्र जडेजा १-०-१-०