टीम इंडियाला विंडीजचे आव्हान

0
95

भारताच्या वेस्ट इंडीज दौर्‍याला आजपासून प्रारंभ होणार आहे. तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरिडा येथे खेळविला जाणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार केल्यास विंडीजचा हा सर्वांत आवडता प्रकार असून भारताला मात्र हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा भावलेला नाही. तरीसुद्धा विंडीजचा संभाव्य विजेते म्हणून संबोधणे योग्य ठरणारे नाही. खेळपट्टीचे पाटा स्वरूप भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना अटीतटीचा होणे अपेक्षित आहे.

भारतीय संघाचा विचार केल्यास शिखर धवन व रोहित शर्मा डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. विराट कोहली आपल्या आवडत्या तिसर्‍या स्थानावर खेळल्यास लोकेश राहुलला चौथ्या स्थानाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो. भारत ‘अ’ संघाच्या विंडीज दौर्‍यात प्रभाव पाडलेल्या श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांच्यात सहाव्या स्थानासाठी चुरस अपेक्षित आहे. २०१८ साली नोव्हेंबरमध्ये पांडे व याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अय्यर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल. अष्टपैलूच्या जागेसाठी रवींद्र जडेजा व कृणाल पंड्या यांच्यात चढाओढ दिसत आहे. विंडीज संघात डावखुर्‍या फलंदाजांची अधिक संख्या पाहता लेगस्पिनर राहुल चहरपेक्षा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर अंतिम ११ मध्ये खेळताना दिसू शकतो. वेगवान विभागात भुवनेश्‍वर कुमार, खलिल अहमद व दीपक चहर या तुलनेने अनुभवी खेळाडूंवर कोहली डाव खेळणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडीजचा संघ टी-ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वांत धोकादायक म्हणून गणला जातो. संघात ख्रिस गेल नसला तरी जगभरातील टी-ट्वेंटी फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव याच संघातील खेळाडूंच्या गाठीशी आहे. आघाडी फळीत डावखुर्‍या फलंदाजांची असलेली फौज संघाला बळकटी देत आहे. पूर्ण तंदुरुस्त नसल्याने आंद्रे रसेल या लढतीत खेळणार नाही. त्याच्या जागी जेसन मोहम्मद याला निवडण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्डवर संघाची भिस्त असेल. गोलंदाजीचे विविध पर्याय असले तरी नवख्या थॉमस व कॉटरेल यांचा भारताच्या आघाडी फळीसमोर निभाव लागणे त्यांच्यादृष्टीने हिताचे ठरेल.
भारत (संभाव्य) ः शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्‍वर कुमार व खलिल अहमद.
वेस्ट इंडीज (संभाव्य) ः इविन लुईस, जॉन कॅम्पबेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नारायण, किमो पॉल, खारी पिएरे, ओशेन थॅमस व शेल्डन कॉटरेल.