
>> शिखर धवनचे नाबाद शतक
>> तिसर्या सामनात ८ गड्यांनी विजय
रविवारी झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ गड्यांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांच्या धारदार मार्यानंतर शिखर धवनने झळकावलेले शतक भारताच्या विजयाचे प्रमुख आकर्षण ठरले.
श्रीलंकेने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा फक्त ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यात १३५ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान श्रेयस अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. अय्यरनंतर शिखर धवनने दिनेश कार्तिकला सोबत घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवनने ८५ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबात १०० धावा केल्या. दिनेश कार्तिकने नाबाद २६ धावा केल्या. लंकेकडून परेरा आणि धनंजयाने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा डाव २ बाद १६० अशा भक्कम स्थितीतून २१५ धावांत संपला. सलामीवीर उपुल थरंगा (९५) याच्या बळीने सामन्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. थरंगा व्यतिरिक्त केवळ सदीरा समरविक्रमा (४२) याला उपयुक्त धावा जमवता आल्या. आजारपणामुळे वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळलेल्या कुलदीपने ३ बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.
धावफलक
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका झे. शर्मा गो. बुमराह १३, उपुल थरंगा यष्टिचीत धोनी गो. कुलदीप ९५, सदीरा समरविक्रमा झे. धवन गो. चहल ४२, अँजेलो मॅथ्यूज त्रि. गो. चहल १७, निरोशन डिकवेला झे. अय्यर गो. कुलदीप ८, असेला गुणरत्ने झे. धोनी गो. कुमार १७, थिसारा परेरा पायचीत गो. चहल ६, सचिथ पथिराना झे. चहल गो. पंड्या ७, अकिला धनंजया त्रि. गो. कुलदीप १, सुरंगा लकमल पायचीत गो. पंड्या १, नुवान प्रदीप नाबाद ०, अवांतर ८, एकूण ४४.५ षटकांत सर्वबाद २१५
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ६.५-०-३५-१, जसप्रीत बुमराह ८-१-३९-१, हार्दिक पंड्या १०-१-४९-२, कुलदीप यादव १०-०-४२-३, युजवेंद्र चहल १०-३-४६-३
भारत ः रोहित शर्मा त्रि. गो. धनंजया ७, शिखर धवन नाबाद १००, श्रेयस अय्यर झे. लकमल गो. परेरा ६५, दिनेश कार्तिक नाबाद २६, अवांतर २१, एकूण ३२.१ षटकांत २ बाद २१९
गोलंदाजी ः सुरंगा लकमल ५-२-२०-०, अकिला धनंजया ७.१-०-५३-१, अँजेलो मॅथ्यूज ३-०-३०-०, सचिथ पथिराना ४-०-३३-०, नुवान प्रदीप ३-०-१०-०, थिसारा परेरा ५-०-२५-१, असेला गुणरत्ने ४-०-३०-०, दनुष्का गुणथिलका १-०-१२-०
नोंदविला नव्वदावा विजय
भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १९७९ साली खेळला. आत्तापर्यंत भारत व श्रीलंका यांच्यात १५८ सामने झाले आहेत. यातील ५६ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. काल रविवारी भारताने लंकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकतानाच त्यांच्याविरुद्ध वनडे क्रिकेटमधील आपला ९०वा विजय नोंदविला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय भारताने लंकेविरुद्धच नोंदविले आहेत.
भारतासाठी ‘सुवर्ण वर्ष’
एकदिवसीय क्रिकेटचा विचार करता भारतासाठी ‘२०१७’ हे कॅलेंडर वर्षांत सर्वांत सफल ठरले. २९ सामन्यांत २१ विजय व ७ पराभव अशी अद्वितीय कामगिरी टीम इंडियाने यावर्षी केली. दुसरीकडे श्रीलंकेला यावर्षी २९ पैकी २३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. आघाडीच्या संघांचा विचार केल्यास यंदा इंग्लंडच्या जय पराजयाची आकडेवारी १५-४ अशी उत्कृष्ट आहे.
सलग आठवा मालिका विजय
द्विपक्षीय संघांमधील सलग आठवी मालिका भारताने काल जिंकली. मागीलवर्षी झिंबाब्वेचा ३-० असा पराभव करून ही मालिका सुरू झाली होती. यानंतर न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडीज व श्रीलंका (प्रत्येकी दोनवेळा) यांचा भारताने पराभव केला आहे. तर भारत व श्रीलंका यांचा समावेश असलेला सलग नववी द्विपक्षीय मालिका भारताने आपल्या नावे केली.
चार हजारी शिखर धवन
‘गब्बर’ नावाने सुपरिचित शिखर धवनने आपल्या ९५व्या डावात चार हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. भारताकडून केवळ विराट कोहली (९३ डाव) याला धवनपेक्षा कमी डावात ही कामगिरी करणे शक्य झाले आहे. सर्वांत कमी डावात १२ शतके झळकावणारा कोहलीनंतरचा तो दुसरा भारतीय ठरला. कोहलीला यासाठी केवळ ८३ डाव लागले होते. जागतिक पातळीवर द. आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने यासाठी केवळ ७३ डाव घेतले होते.