टीम इंडियात बुमराह, धवनचे पुनरागमन

0
118

>> श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघांची घोषणा

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व सलामीवीर शिखर धवन यांचे मायदेशात होणार्‍या आगामी दोन मालिकांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्ध ५ जानेवारीपासून होणार्‍या तीन टी-ट्वेंटी तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ जानेवारीपासून खेेळविल्या जाणार्‍या तीन वनडे सामन्यांसाठी या द्वयीचा संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताच्या वेस्ट इंडीज दौरा झाल्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. यामुळे मायदेशात झालेल्या बांगलादेश व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकांना देखील त्याला मुकावे लागले होते. पुनर्वसनानंतर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून विंडीजविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यापूर्वी बुमराहने नेट्‌समध्ये गोलंदाजी करत आपल्या तंदुरुस्तीची चाचपणी केली.

दुसरीकडे शिखर धवनला दुखापतींच्या मालिकांमुळे संघाच्या आत-बाहेर व्हावे लागले आहे. सुरुवातीला अंगठ्याच्या दुखापतीमुळे त्याला विश्‍वचषक स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागली होती. विंडीजविरुद्धच्या मालिकेद्वारे पुनरागमन करतानाच मायदेशातील बांगलादेशविरुद्धची मालिकादेखील धवनने खेळली. यानंतर सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील एका लढतीत क्रिझमध्ये परतण्यासाठी लगावलेली डाईव्ह त्याला महागात पडली. गुडघ्याला मोठी दुखापत झाल्याने त्याला २५ टाके घालावे लागले. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असून पुनरागमनास सज्ज झाला आहे. टी-ट्वेंटी संघात धवनला रोहित शर्माच्या जागी निवडण्यात आले आहे. तर दुखापतग्रस्त भुवनेश्‍वर कुमारची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आहे. धवनच्या परतण्यामुळे अतिरिक्त सलामीवीर मयंक अगरवालला संघात जागा मिळालेली नाही. दीपक चहरला एप्रिल २०२० पर्यंत क्रिकेटपासून दूर रहावे लागणार असल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत ४०, नाबाद १६ व ९ धावा केलेल्या केदार जाधवने आपली संघातील जागा राखली आहे.

न्यूझीलंडमधील मालिकेसाठी भारत ‘अ’ वनडे संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका असेल. आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉ याला दोन चार दिवसीय अनधिकृत कसोटींसाठी निवडण्यात आले आहे. या संघांत रविचंद्रन अश्‍विन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे व वृध्दिमान साहा या अनुभवींना देखील सामावून घेण्यात आले आहे. अनधिकृत कसोटींसाठी विहारीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

भारत टी-ट्वेंटी संघ ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह व वॉशिंग्टन सुंदर.
भारत वनडे संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर व मोहम्मद शमी.

भारत ‘अ’ दोन टूर सामने व तीन वनडे सामने ः पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्‍वरन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अक्षर पटेल, राहुल चहर, संदीप वारियर, ईशान पोरेल, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारत ‘अ’ पहिला चारदिवसीय सामना ः पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्‍वरन, शुभमन गिल, हनुमा विहारी, केएस भरत, शिवम दुबे, शहाबाज नदीम, राहुल चहर, संदीप वारियर, अवेश खान, मोहम्मद सिराज, ईशान पोरेल व ईशान किशन.

भारत ‘अ’ दुसरा चारदिवसीय सामना ः पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृध्दिमान साहा, हनुमा विहारी, केएस भरत, शिवम दुबे, रविचंद्रन अश्‍विन, शहाबाज नदीम, संदीप वारियर, अवेश खान, मोहम्मद सिराज व ईशान पोरेल.