टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

0
67

>> पदार्पणवीर किशनचे अर्धशतक

>> विराटची कप्तानी खेळी

>> भारताची मालिकेत १-१ अशी बरोबरी

पदार्पणवीर ईशान किशन याचे अर्धशतक व कर्णधार विराट कोहली याच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारताने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात इंग्लंडचा ७ गडी व १३ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १७.५ षटकात ७ गडी राखून गाठले.

भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना शिखर धवन व अक्षर पटेल यांच्या जागी ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. दुसरीकडे इंग्लंडने जायबंदी मार्क वूडच्या जागी टॉम करनचा संघात समावेश केला.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भुवनेश्‍वर कुमारने जोस बटलर (०) याला लवकर बाद करत भारतासमोरील मोठा अडसर दूर केला. डेव्हिड मलान व जेसन रॉय यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. चहलने मलानला पायचीत करत ही धोकादायक ठरत असलेली जोडी फोडली. पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर भारताने रिव्ह्यूचा वापर करत मलानना माघारी धाडले. इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. परंतु, एकालाही अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी योग्य दिशा व टप्पा राखत इंग्लंडला १६४ धावांत रोखले. इंग्लंडप्रमाणेच भारताची सुरुवात भयावह झाली. राहुल सलग दुसर्‍या सामन्यात भोपळाही न फोडता बाद झाला. कोहली व किशन यांनी दुसर्‍या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी रचत विजयाचा भक्कम पाया रचला. कोहलीने आपले २६वे तर किशनने पहिलेवहिले अर्धशतक लगावले. पंतने झटपट २६ धावा केल्या. मालिकेतील तिसरा सामना मंगळवार १६ रोजी खेळविला जाणार आहे.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. भुवनेश्‍वर गो. सुंदर ४६, जोस बटलर पायचीत गो. भुवनेश्‍वर ०, डेव्हिड मलान पायचीत गो. चहल २४, जॉनी बॅअरस्टोव झे. यादव गो. सुंदर २०, ऑईन मॉर्गन झे. पंत गो. ठाकूर २८, बेन स्टोक्स झे. पंड्या गो. ठाकूर २४, सॅम करन नाबाद ६, ख्रिस जॉर्डन नाबाद ०, अवांतर १६, एकूण २० षटकांत ६ बाद १६४
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२८-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२९-२, शार्दुल ठाकूर ४-०-२९-२, हार्दिक पंड्या ४-०-३३-०, युजवेंद्र चहल ४-०-३४-१
भारत ः लोकेश राहुल झे. बटलर गो. सॅम करन ०, ईशान किशन पायचीत गो. रशीद ५६ (३२ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार), विराट कोहली नाबाद ७३ (४९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), ऋषभ पंत झे. बॅअरस्टोव गो. जॉर्डन २६, श्रेयस अय्यर नाबाद ८, अवांतर ३, एकूण १७.५ षटकांत ३ बाद १६६
गोलंदाजी ः सॅम करन ४-१-२२-१, जोफ्रा आर्चर ४-०-२४-०, ख्रिस जॉर्डन २.५-०-३८-१, टॉम करन २-०-२६-०, बेन स्टोक्स १-०-१७-०, आदिल रशीद ४-०-३८-१

विराट बनला पहिला ‘तीन हजारी’
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. कोहलीने ख्रिस जॉर्डनच्या चेंडूवर विजयी षटकार खेचत आपल्या तीन हजार धावा पूर्ण केल्या. ८७ सामन्यांत ५०.८६च्या सरासरीने कोहलीच्या नावावर ३००१ धावा जमा झाल्या आहेत. २८३९ धावांसह न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल दुसर्‍या तर भारताचाच रोहित शर्मा (२७७३) तिसर्‍या स्थानावर आहे.