झोजिलाचे स्वप्न

0
21

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विकासपुरूष म्हटले जाते ते वावगे नाही. भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवून ते काम करतात आणि त्यामुळे नेहमीच त्यांच्या हातून मोठमोठे प्रकल्प लीलया साकारताना दिसतात. ते महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दिमाखदार फ्लायओव्हर तर उभे राहिलेच, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत उत्तम रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. त्यापासून प्रेरणा घेऊनच पुढे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देशात सुरू झाली. गडकरी केंद्रात गेले आणि सुवर्ण चतुष्कोणसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आधारस्तंभ बनले. देशभरात देशवासीयांना अभिमान वाटावे असे महामार्ग, पूल, बोगदे यांचे जाळे त्यांनी राज्याराज्यांत विणले आहे. याच कामगिरीतील ताजा शिरपेच आहे तो आहे काश्मीर आणि लडाख यांना जोडणारा झोजिला खिंडीतील बोगदा. त्याचे काम वेगाने सुरू आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत आशिया खंडातील हा सर्वांत लांब बोगदा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. चढायला महाकठीण अशी झोजिला खिंड हिवाळ्यात गारठते आणि काश्मीरचा लडाखशी संपर्कच तुटतो. तिची दुर्गमता अनुभवायला तेथून प्रवास करायला हवा, तरच क्षणोक्षणी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या त्या प्रवासाची भीषणता कळते. या दुर्गमतेचाच फायदा उठवून पाकिस्तानने दोहोंमधल्या द्रास आणि कारगिल भागातील मोक्याची शिखरे ताब्यात घेऊन या मार्गावरील दळणवळण बंद पाडले होते. त्या घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी आपली किती शक्ती खर्च झाली आणि किती जवान शहीद झाले हा कटू इतिहास आपल्यासमोर आहेच. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटनंतर पाकिस्तान भारताला ललकारण्याच्या स्थितीत सध्या नाही, पण चीन लडाखपासून अरुणाचल प्रदेशकडे वाकडी नजर करून पाहतो आहे. काल आपले गृहमंत्री अमित शहा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर होते, त्यालाही चीनने आक्षेप घेतला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सीमावर्ती प्रदेशांना जोडणाऱ्या अशा प्रकल्पांचे सामरिक महत्त्व लक्षात येते. लडाख आणि काश्मीरला जोडणाऱ्या झोजिला खिंडीखालून जाणाऱ्या या तेरा किलोमीटरच्या आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचा फार मोठा लाभ त्या दोन संघप्रदेशांना आणि पर्यायाने देशाला होणार आहे. पहिला सर्वांत मोठा लाभ म्हणजे हा बोगदा तयार झाल्यानंतर सर्व प्रकारच्या हवामानात तो खुला राहणार असल्याने वाहनांची ये-जा सुरू राहील. त्यामुळे अर्थातच सैन्यदलांच्या हालचालींना हिवाळ्यात येणारी बाधा दूर होईल. लडाखकडे जाण्याचे दोन मार्ग सध्या आहेत. एक काश्मीरमधून सोनमर्ग – बालटाल पार करून झोजिला खिंडीतून जाणारा श्रीनगर – लेह महामार्ग, तर दुसरा कुलू मनाली रोहतांगवरून जाणारा मनाली – लेह महामार्ग. यापैकी दुसऱ्या मार्गावर रोहतांग येथे दिमाखदार असा अटल बोगदा उभा राहिला आहे. नऊ किलोमीटर लांबीचा हा बोगदा सध्या आशियातील सर्वांत लांब बोगदा आहे. आता त्याचाच विक्रम मोडीत काढून झोजिलामध्ये बोगदा साकारतो आहे. म्हणजे या दोन्ही बोगद्यांमुळे लेह लडाख सदासर्वकाळ संपर्कात राहू शकेल. सामरिकदृष्ट्या तर हे महत्त्वाचे आहेच, परंतु त्याच बरोबर स्थानिक जनजीवनात सुधारणेसाठी विकासाची गंगा दुर्गम लेहलडाखपर्यंत पोहोचवण्यातही हे बोगदे महत्त्वाची भूमिका बजावतील. मालवाहतूक असो अथवा पर्यटन असो, आजवर दुर्गम आणि अविकसित राहिलेल्या भागाचा कायापालट घडवण्याचे सामर्थ्य यात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या एकोणीस ठिकाणी बोगदे बनत आहेत. झोजिला खिंडीतील प्रत्यक्ष बोगदा जरी तेरा किलोमीटरचा असला, तरी दोन्ही बाजूंचे त्याला जोडणारे मार्ग विचारात घेतले तर सोनमर्ग ते द्रासमधील मिनीमर्गपर्यंतचे अंतर 31 किलोमीटरचे आहे. बारा हजार फुटांवर हे काम चालले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. असंख्य अडचणींचा सामना अशा कामात करावा लागतो. हिमदरड कोसळल्याने कंत्राटदार कंपनीची 38 यंत्रे गाडली गेली जी अजून वर काढता आलेली नाहीत. काही कामगारांचा त्या दुर्घटनेत बळीही गेला. काश्मीरच्या दक्षिण टोकाला लोहमार्ग जोडणी पूर्ण झाली आहे. तेथेही बोगद्यांची कामे पूर्ण झाल्याने आणि लोहमार्ग खुला झाल्याने काश्मीर खोरे दळणवळणदृष्ट्या जवळ आलेले आहेच. आता द्रास – कारगिल – लेह – लडाखचा परिसरही असाच जवळ येईल. मार्गच बंद झाल्याने हिवाळ्यात लेह लडाखचे सगळे जनजीवन ठप्प व्हायचे तसे आता होणार नाही हे तर आहेच, परंतु देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, सीमावर्ती प्रदेश सुरक्षित करणारी ही विकासकामे महत्त्वाची आहेत आणि म्हणूनच त्यांची नोंद देशवासीयांनी घेणे गरजेचे आहे.