झूक्सचा १० गड्यांनी विजय

0
284

>> अंतिम फेरीत आज त्रिनबागो नाईट रायडर्सशी होणार सामना

साखळी फेरीत सलग तीन विजयांची नोंद करून उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने काल झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत मात्र साफ निराशा केली. सेंट लुसिया झूक्सविरुद्ध १३.४ षटकांत अवघ्या ५५ धावांत गारद होऊन त्यांनी स्पर्धेच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत कमी धावसंख्या नोंदवली. झूक्सने केवळ ४.३ षटकांत एकही गडी न गमावता विजयी लक्ष्य गाठताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. रहकीम कॉर्नवॉल व मार्क दयाल यांनी गयानाच्या गोलंदाजांची पिसे काढताना झूक्सला प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. अंतिम फेरीत त्यांचा सामना स्पर्धेत अजूनपर्यंत अपराजित असलेल्या त्रिनबागो नाईट रायडर्स यांच्याशी होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्व काही झूक्सच्या मनासारखे घडले. ब्रेंडन किंग याला आंद्रे फ्लेचरकडे झेल देण्यास भाग पाडल्यानंतर कुगलाईनचा एक सरळ मधल्या यष्टीच्या दिशेने जाणारा चेंडू हेटमायरने सोडल्यामुळे पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर गयानाची २ बाद ० अशी केविलवाणी स्थिती झाली होती. कुगलाईनला पहिल्या षटकात मिळालेली मदत पाहता खेळपट्टी मध्यमगती गोलंदाजांना मदत करेल असे वाटत होते. परंतु, तसे घडले नाही. मोहम्मद नबीने डावातील दुसरे व स्वतःचे पहिले षटक निर्धाव टाकून दबाव कायम ठेवला. कुगलाईनने टाकलेल्या डावातील तिसर्‍या षटकात पूरनने दोन सुरेख फटके चौकारांसाठी लगावले. पण, चौथ्या षटकात दयालने पूरनचा सुरेख झेल घेत गयानाला तिसरा धक्का दिला. यानंतर गयानाचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. नबीच्या चिवट मार्‍यानंतर चेज, ग्लेन, झहीर व दयाल यांनी गयानाच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. डावातील तेराव्या षटकापर्यंत तग धरताना सलामीवीर हेमराज याने २५ धावा केल्या. गयानाच्या डावातील दोन पैकी एक षटकार त्याने लगावला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कॉर्नवॉल व दयाल यांनी ख्रिस ग्रीन व ताहीर यांचा समाचार घेतला. कॉर्नवॉलने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३२ तर दयालने १० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद १९ धावा करत संघाला दहा गडी व ९३ चेंडू राखून विजयी केले.

धावफलक
गयाना ऍमेझॉन वॉरियर्स ः ब्रेंडन किंग झे. फ्लेचर गो. कुगलाईन ०, चंद्रपॉल हेमराज त्रि. गो. दयाल २५, शिमरॉन हेटमायर त्रि. गो. कुगलाईन ०, निकोलस पूरन झे. दयाल गो. नबी ११, रॉस टेलर पायचीत गो. चेज ३, किमो पॉल झे. विल्यम्स गो. चेज २, ख्रिस ग्रीन झे. नबी गो. ग्लेन ११, केव्हिन सिंक्लेअर यष्टिचीत फ्लेचर गो. झहीर १, रोमारियो शेफर्ड झे. व गो. दयाल ०, नवीन उल हक नाबाद ०, इम्रान ताहीर झे. कॉर्नवॉल गो. झहीर ०, अवांतर २, एकूण १३.४ षटकांत सर्वबाद ५५

गोलंदाजी ः स्कॉट कुगलाईन २-०-१२-२, मोहम्मद नबी ३-१-६-१, रॉस्टन चेज ४-०-१५-२, झहीर खान २.४-०-१२-२, जावेल ग्लेन १-०-८-१, मार्क दयाल १-०-२-०
सेंट लुसिया झूक्स ः रहकीम कॉर्नवॉल नाबाद ३२, मार्क दयाल नाबाद १९, अवांतर ५, एकूण ४.३ षटकांत बिनबाद ५६
गोलंदाजी ः ख्रिस ग्रीन १.३-०-१६-०, इम्रान ताहीर २-०-२४-०, नवीन उल हक १-०-१६-०