झुला… नवरात्रीचा

0
335
  • पौर्णिमा केरकर

आज महामारीमुळे मंदिरांना भाविकांअभावी सुन्नता आलेली आहे… सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. असे असले तरी ऋतुचक्र मात्र कोणासाठीही थांबलेले नाही. सगळेच उत्सव तारखांवरून कळतात. नैसर्गिक गंध त्यांना आहेच; परंतु माणूस मात्र दुरावला आहे.

‘घटस्थापना’ भूमीच्या सर्जकतेचा उत्सव. हा आनंदोत्सव दरवर्षी अभूतपूर्व उत्साहाने देशभर साजरा होतो. ‘घट’ हे स्त्रीच्या गर्भाचे प्रतीक. त्याची पूजा ही तर नवनिर्मितीचीच पूजा. आश्विनात वातावरणाला नैसर्गिक चकाकी लाभलेली आहे. याला सळसळत्या उत्साहाची किनार तर आहेच, त्याशिवाय धनधान्याची सुबत्ता अनुभवता यायची ती याच कुबेर मासात.
प्रत्येक सकाळ या प्रसन्नतेच्याच चेहर्‍याने घरीदारी प्रवेश करती व्हायची. हवेत गारठा. हा गारठा परंपरेने वर्णन केल्याप्रमाणे कडाक्याच्या थंडीचा नव्हे तर तो गुलाबी… गुलाबी… हवाहवासा वाटणारा. झाडापानांची तकाकी… त्यांची स्वतंत्र सळसळ… पक्ष्यांचा किलबिलाट… आणि अवतीभोवती बघितले तर रानभेंडीची पिवळसर पांढरी झाक असलेली फुले डवरलेली आपण जाऊ त्या वाटेवर दिसायची. आजही ती तशीच फुलत आहेत खरी, पण म्हणावे तेवढे त्यांच्याकडे लक्षच जात नाही.

एरव्ही घटस्थापना-दसर्‍याला भेंडी आणि झेंडू यांची फुले हमखास असायलाच हवीत, असे परंपरेचे मत. या फुलांना काही मोगरी-जाईसारखा गंध नाही किंवा गुलाब-निशिगंधाची मादकता नाही; पण असे असताना- सर्जकतेचा सन्मानसोहळा साजरा करताना- लोकमानसाने याच फुलांचा वापर प्रामुख्याने का बरं केला असावा, हाही प्रश्‍न पडतो. सुफलन… सर्जन… निर्मिती आणि याला वेढून असलेली शक्ती. नऊ रात्री नऊ देवींची पूजा मंदिरांतून आरंभीली जाते. या दिवसांत प्रत्येक रात्र मंतरलेली. देवीची पूजा बांधायची, तिच्यासाठी झुला तयार करायचा… या झुल्याची अशी काही आकर्षक सजावट केली जाते की अक्षरशः तिला गायन-वादनाच्या गजरात झुलविताना साक्षात आदिमाया जिवंत होऊन समोर अवतीर्ण झाली आहे असेच वाटते. देवीला झुल्यावर बसून झोके द्यायचे, तिच्यासाठी खास नौकाविहार घडवून आणायचा…

यासाठी तिची जी सजावट केली जाते ती किती मनोहारी असते. जे कलात्मक हात तिला साडी नेसवतात, दागिने फुलांची सुंदर रचना करून तिच्या अंगावर घालतात… सभोवतालची आरास… झुल्याची सजावट… या नवरात्रीच्या दिवसांत रात्रीच्या निरवतेत देवीचा झुला आणि मंदिरातील वातावरण अनुभवण्यासाठी जाणे हा जीवनातील साक्षात्कारी अनुभव असतो. या क्षणातील असीम शांतता वेगळ्या जगात घेऊन जाते. फक्त कर्मकांडं घेऊन हा असा अनुभूतीचा प्रवास करता येत नाही. जीवनात अशा बर्‍याच गोष्टी असतात जिथे आपण पारदर्शक होऊन गेलो की काही खटकत नसतं.

आज महामारीमुळे मंदिरांना भाविकांअभावी सुन्नता आलेली आहे… सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. असे असले तरी ऋतुचक्र मात्र कोणासाठीही थांबलेले नाही. सगळेच उत्सव तारखांवरून कळतात. नैसर्गिक गंध त्यांना आहेच; परंतु माणूस मात्र दुरावला आहे. नाही म्हटले तरी उदासीनता मनामनात पसरलेली आहे… मन मोकळं करण्यासाठी, मनाला दिलासा देण्यासाठी मंदिर आणि समोर दिसणारी मूर्ती हे भाविकांचे श्रद्धास्थान! त्याच्यासमोर नतमस्तक झालं की अर्धी वेदना कमी व्हायची. हा आधार काही काळापुरती विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकमनावर खोलवर जाणवतो.

हवाहवासा वाटणारा पाऊस… जून-जुलै महिन्यांत पडूनही गेला… तेवढेसे अप्रूप या वेळेला वाटले नाही, त्याचा हवाहवा इतका सहवास लाभला नाही म्हणून हे असे असेल. नाही म्हटले तरी घराघरांत चतुर्थी सकारात्मकतेने साजरी झाली. दसरा-दिवाळीला सगळं निवळेल ही आशा घेऊन वाट पाहिली तोच नवरात्रात पावसाचे सावट! बाहेर थंडगार पाऊस कोसळत आहे. पाऊस तर धारित्रीचा प्रियकर… त्याच्या बरसण्याची असोशी तिला असतेच असते. त्याच्या त्या सुरुवातीच्या आवेगातूनच ती उल्हसित झालेली असते. आश्विनात तर ती टवटवीत, ताजीतवानी आणि प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करणारी. तिचं अल्लड, अवखळ तारुण्य… आश्विन येईपर्यंत परिपक्व होत जाते. ती चाहूल घेते प्रसवशील… सर्जक निर्मितीसाठी पूर्णपणे तयार असलेली ती… तो आनंदच चराचरात भरून राहिलेला असता लोकमानस तिच्याशी जोडून घेत, तिला झुल्यावर बसवून झोके देऊन आनंद द्विगुणित करतात.

बोरकरांनी श्रावण मासाला सृष्टीचा पाचवा महिना असे म्हटले आहे. गरोदर स्त्रीला जेव्हा पाचवा महिना लागलेला असतो तेव्हा तिच्या चेहर्‍यावर आगळीवेगळी चमक दिसते. या महिन्यात ती माहेरवाशीण होते. तिला हिरव्या रंगाने सजवून सृष्टीशी तिचे असलेले नाते अधोरेखित केले जाते. निसर्गातील विभ्रम टिपून आपल्याही जीवनात ती परिपूर्णता आणण्याचा हा पारंपरिक रिवाज… यात किती रसरशीतपणा होता. जेव्हा केव्हा या सगळ्याला सुरुवात झाली असावी तेव्हा तर त्यात कलात्मक नितळता हाच एकमेव निकष असावा. त्याला मान-अपमानाची जोड देऊन मूळ हेतूपासूनच आता आपण दुरावत चाललो आहोत.

नवरात्रीचा शक्तीउत्सव हेही याचेच प्रतीक आहे. श्रावण महिन्यातील ती नवथर ललना आश्विनात शक्तिशाली आदिमाया बनून दुष्टांचा संहार करते… शेत-शिवारांतून पीकपाण्याची रसद घराघरांत पोहोचते ती याच दिवसांत. अवतीभवती प्राणी, पक्षी, वृक्ष, वेलीत
चापल्य अनुभवता येते तेही याच दिवसांत! नवरात्र, दसरा आणि दिवाळी… प्रकाशपूजक उत्सव… आज या उत्सवांवर उदासीनतेची छटा आहे. हे दिवस प्रसन्नतेचे, हा उत्साह रंध्रारंध्रांतून अनुभवताना वाटायचे, जणूकाही आनंदलहरीच्या झुल्यावर आपण मस्तपैकी झुलत आहोत. आपल्याला सर्व जगाचा विसर पडला आहे. हेवेदावे, रुसवे-फुगवे, तिरस्कार, लोभ, मोह… या कुठल्याही गुंतवळ्यात आपण नाही. झुल्याची हीच ओढ मग कायम ठेवीत लोकमनाने आपल्या श्रद्धास्थानाला झुल्यावर बसवून झोके देण्यासाठी स्वतःला समरस केले.

आज समस्त मानवी जीवन एका अनिश्चिततेच्या झुल्यावर झोके घेत आहे. महामारीने एका झटक्यात मी मी म्हणणार्‍यांना त्यांची-त्यांची जागा दाखविली आहे. नवरात्रीत नऊ माळा घटावर सोडल्या जातात. त्यावर आशीर्वादरूपी अभिषेक करण्यासाठी याच दिवसांत पाऊस दरवर्षी झिरझिरायचा. या वर्षी मात्र तो काळोख होऊन कोसळत आहे. गोव्यात नसला तरी त्याने इतरत्र मात्र हाहाकार माजविलेला दिसतो. झुल्यावर बसून लोकवाद्यांच्या गजरातील तिचं
झुलणं मनात भरून शक्तिरूपिणीच्या सर्जक सुफलनतेचा सन्मान करूया, सकारात्मक होऊन सृष्टीलावण्याच्या झुल्यावर झुलूया…