भाजपची घसरगुंडी, मुख्यमंत्र्यांचाही पराभव
झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस-आरजेडी आघाडीने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून ८१ पैकी या दोन्ही पक्षांना ४६ जागा मिळाल्या असून भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभेच्या ८१ जागा असणार्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने सर्वाधिक ३० जागा मिळवल्या असून कॉंग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत.
झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत पाच टप्प्यांत मतदान झाले. काल दि. २३ रोजी मतमोजणी झाली. आतापर्यंतचे कल आणि निकाल पाहता जेएमएमचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री रघुबर दास यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपमधूनच बंडखोरी केलेल्या सरयू राय यांनी त्यांना जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारायला भाग पाडले आहे.
भाजपला महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक जागा लढवून आणि सर्वाधिक मताधिक्य मिळवूनही भाजपला येथेही सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.
सन २०१४ मध्ये आजसू, जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवणारा भाजप यावेळी मात्र स्वबळावर निवडणुकीत उतरला होता.
पक्षीय बलाबल
झामुमो + कॉंग्रेस ४६
भाजप ः २५
जेव्हीएम ः ३
एजीएसयुपी ः २
आरजेडी ः १
इतर ः ४
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
राज्यातील जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगत झारखंडचे भाजप नेते व मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. राज्यातील जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मावळते मुख्यमंत्री रघुबर दास यांनी आभार मानले.
हे माझ्या वडिलांच्या मेहनतीचे फळ ः सोरेन
विजयाकडे वाटचाल सुरू असताना जेएमएमचे नेते आणि संभाव्य मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सायकलवरून रपेट केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, निवडणुकीतला विजय हे आपले पिता शिबू सोरेन यांच्या अथक मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले.
जनादेशाचा स्वीकार ः शहा
झारखंडमधील निकालावर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना, आम्हाला झारखंडमधील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो असे म्हटले आहे. भाजपाला पाच वर्ष जनतेच्या सेवेची जी संधी दिली होती, त्यासाठी आम्ही जनतेचे मनातून आभारी आहोत. राज्याच्या विकासासाठी भाजप सदैव कटीबद्ध राहील.