ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांचे निधन

0
31

एक निर्भीड पत्रकार, अन्यायाविरुद्ध कठोर शब्दांत लेखणी चालविणारे दैनिक राष्ट्रमतचे माजी संपादक सीताराम टेंगसे यांचे वयाच्या ८५ वर्षी काल सकाळी मडगाव येथील एका खासगी हॉस्पिटलात निधन झाले. काल सायंकाळी मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी उल्हासिनी, पुत्र अरविंद टेंगसे, कन्या अपर्णा खरंगटे व नातू तेजन खरंगटे असा परिवार आहे.

निपक्षपाती पत्रकारिता हे सीताराम टेंगसे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे राष्ट्रमतातील अग्रलेख हे विस्तृत व अभ्यासपूर्ण असत. ते अफाट वाचन, सखोल मनन व चिंतन करीत. त्यांचा जन्म काणकोण तालुक्यातील लोलये येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लालेये व कारवार येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात गेले व तेथे फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात मोठमोठे नेते, लेखक, साहित्यिक यांच्याशी त्यांची जवळीक झाली आणि त्यांच्या विचारांवर प्रभाव टेंगसे यांच्यावर पडला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वप्रथम काणकोण येथील निराकार विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे एक-दोन वर्षे काम केल्यानंतर मडगाव येथील श्री दामोदर विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले.

मात्र नंतर ते पत्रकारिता क्षेत्रात शिरले. १९६५ च्या दरम्यान मडगाव येथे गोमंतवाणी हे मराठी दैनिक सुरू झाले होते, तेथे ते उपसंपादक म्हणून रुजू झाले. ते बंद पडल्यानंतर दैनिक राष्ट्रमतचे संपादक कै. चंद्रकात केणी यांनी त्यांना दैनिक राष्ट्रमतमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. राष्ट्रमतमध्ये उपसंपादक, प्रमुख वृत्त संपादक व संपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यांना गोवा माहिती व प्रसिद्ध खात्याचा टी. बी. कुन्हा जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार (२०२०), लक्ष्मीदास बोरकर स्मृती टिळक पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच दक्षिण गोवा पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील अग्रणी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.