ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागूंची एक्झिट

0
85

>> हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर आपल्या अभिनय कौशल्याने ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (५९) यांचे काल मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल बुधवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना कोकिलाबेन अंबानी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती. इस्पितळावर त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचार चालू असातानाच बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कोणत्याही प्रकारच्या एकाच इमेजमध्ये न अडकता रीमा लागू यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. रीमा लागू यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या रीमा ह्या कन्या होत. त्यांचे माहेरचे नाव नयन भडभडे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले. त्यांचे पुरुष हे नाटक फार गाजले. त्याचप्रमाणे घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सासू माझी ढांसू यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी दर्जेदार अभिनयाचे दर्शन रसिकांना घडवले होते. ‘सिंहासन’मधील सून आणि ‘तू तू मैं मैं’ मधील सासू, रंगभूमीवरील नायिका आणि बॉलिवूडमधील अनेक नायकांची ‘आई’, अशा बहुरंगी-बहुढंगी भूमिका त्यांनी साकारून अभिनय कौशल्य दाखवून दिले होते.
चित्रपट आणि रंगभूमीप्रमाणेच दूरदर्शनवरही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यात खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं मै, दो और दोन पांच या मालिकांमुळे रीमा लागू प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून राहिल्या होत्या. सध्या त्या नामकरण या मालिकेत दयावंती मेहता ही भूमिका साकारत होत्या. बॉलिवूडच्या बहारदार पडद्यावरून त्या जगभर पोहोचल्या होत्या. मैने प्यार किया मधील सलमानखानची आई म्हणून त्या गाजल्या. त्यानंतरहम आपके है कौन, कुछ कुछ होता है, कयामत सें कयामत तक, कल हो ना हो, यासारख्या सिनेमांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ’ग्लॅमरस आई’ म्हणून त्यांनी अभिनय साकारला. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या मृण्मयी हिनेही सिने नाट्यसृष्टीत पदार्पण केले आहे.
मान्यवरांची श्रद्धांजली
चार दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह मालिका आणि नाटकांतील भूमिकांद्वारे रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. रीमा लागू यांच्या निधनाबद्दल रंगभूमीवरील आणि सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज, तसेच खेळाडू आणि मान्यवरांनी दु:ख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेता ऋषी कपूर, मुक्ता बर्वे, वीरेंद्र सेहवाग, करण जोहर, सोनी राझदान, रितेश देशमुख, आदींचा समावेश आहे.