ज्ञान व विचार

0
7

योगसाधना ः 632, अंतरंगयोग ः 218

  • डॉ. सीताकांत घाणेकर

कुटुंबातदेखील पूर्वीसारखा सहकार दिसत नाही. त्यामुळे एकत्रित कुटुंबपद्धती नष्ट होऊन उपग्रह कुटुंबे तयार होतात. चांगले संस्कार मुलांवर होत नाहीत. मग आपण प्रारब्धाला, नशिबाला दोष देतो.

परमेश्वराने अत्यंत कल्पकतेने व कष्टाने घडवलेल्या विश्वात करोडो माणसे आहेत- विविध स्वभावाची, व्यक्तिमत्त्वाची- विविध कार्यासाठी एकत्र येतात. स्वभावतःच मानव एकटा राहू शकत नाही. त्याला कुटुंब, समाज यांची फार गरज असते.
एकत्र राहण्यासाठी अनेक गुण आवश्यक आहेत- मुख्यत्वे करून सद्गुण. पण तसा सद्गुणांचा पुतळा भेटणे अगदी दुर्मीळ- पूर्णपुरुषोत्तम कुणीच असणार नाही. त्यामुळे सगळीकडे अनेक क्लेश उद्भवतात- भांडणे, लढाया, घटस्फोट, आत्महत्या, खून… हे जर सर्व टाळायचे असेल तर सद्गुण अंगात वागवणे फार आवश्यक आहे. एक गुण तर अत्यंत गरजेचा आहे, तो म्हणजे विश्वास!
शास्त्रकार सांगतात ः ‘न एकाकी रमती- द्वियात्‌‍ वै भयं महती।’

माणूस एकटा राहू शकत नाही व दुसऱ्याची त्याला भीती वाटते.
खेड्यातील एक तरुण शहरात शिकायला अथवा नोकरीला येतो. गाव दोनशे कि.मी. दूर. शहरात संस्कृती जरा वेगळी असते. कसल्याही कार्यक्रमाला दारू पिणे हे अगदी साहजिक झाले आहे. तरुणाचे मित्र त्याला दारू घेण्याचा आग्रह करतात, पण त्याच्या कुटुंबातील संस्कारांमुळे तो नाकारतो. त्यावेळी ते त्याला समजावतात की तुझा गाव दोनशे कि.मी. दूर आहे आणि आता तुझ्या गावातील कुणीही व्यक्ती इथे नाही. मग तू थोडी दारू घेतली तर तुझ्या घरी ते कसे कळेल? त्यावेळी तो तरुण म्हणतो, माझ्या घरच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला मी तडा द्यायला तयार नाही. तो विश्वासघात ठरेल.
प्रत्येक तरुणाला सुंदर तरुणी विवाहासाठी हवी असते. पण लग्नानंतर ज्यावेळी त्याची पत्नी नोकरीवर जाते त्यावेळी तिच्यावर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असते; नाहीतर कुटुंबात भांडणे व भयानक परिस्थिती येऊ शकते. आजकाल अशा घटना घडतातदेखील.

देवभक्त व्यक्ती देव मानतात. पण त्यांचा देवावर विश्वास किती दृढ असतो हे त्यांनीच बघायला हवे. खरे म्हणजे देवावर अखंड श्रद्धा हवी. जेव्हा चांगल्या घटना घडतात तेव्हा आपला देव मानतो; पण संकटे आली तर देवाला दोष देतो. खरे म्हणजे प्रत्येकाचे भाग्य/प्रारब्ध कर्माप्रमाणे तीच व्यक्ती ठरवते. म्हणून सदोदित सत्कर्म करणे आवश्यक आहे. शेवटी जीवनातील घटना म्हणजे कर्मफळच आहे.
विश्वास हा घरापासूनच असायला हवा, नाहीतर रणांगणात विजय व अंगणात हार मिळेल.
समाजात अशा घटना पुष्कळ घडतात.

  • एका बाईचा नवरा अपघातात वारला. ते कुटुंब अत्यंत देवभक्त होते. घरी लहान मुले होती. तिला देवाचा राग आला व देवघरातील सगळ्या मूर्ती तिने काढून टाकल्या.
  • एक तरुण मुलगी- चांगले गुण मिळवणारी, पण एकदा परीक्षेत नापास झाली. तिने घरातील देवांचे सर्व फोटो फोडून टाकले.

अज्ञानामुळे अशा घटना घडतात, त्यापेक्षा विपरित ज्ञानामुळे घडतात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आजच्या तथाकथित वेगवान जीवनात योग्य ज्ञान मिळवण्याची आवड कमी झालेली दिसते. याचे कारण म्हणजे वाचनसंस्कृती कमी झाली आहे. त्यामुळे माणसाची प्रवृत्ती बदलते आहे.
प्रसिद्ध आंग्ल कवी जगाला स्टेज व आम्हा मानवाना अभिनेते म्हणतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. एक असते सहकाराची भूमिका. पूर्वीचे लोक दुष्काळावर एक उपाय सुचवत असत- ‘पाणी अडवा- पाणी जिरवा.’ अनेक गावात हा प्रयोग करत असत. काही ठिकाणी अजूनही करतात. गावातील अनेकजण सहकार्य देत. पण हल्ली एक नवी घोषणा ऐकायला मिळते- ‘माणसे अडवा- त्यांची जिरवा.’ राजकारण्यांमध्ये ही प्रवृत्ती जास्त दिसते.

कुटुंबातदेखील पूर्वीसारखा सहकार दिसत नाही. त्यामुळे एकत्रित कुटुंबपद्धती नष्ट होऊन उपग्रह कुटुंबे तयार होतात. चांगले संस्कार मुलांवर होत नाहीत. मग आपण प्रारब्धाला, नशिबाला दोष देतो. काहीजण ज्योतिशाला भेटतात. तो ग्रहांना दोष देतो.
ग्रहांबद्दल बोलताना एक व्यक्ती विनोदाने म्हणायची, “ग्रहांना वेळ आहे आपल्याकडे बघायला? असे आपण कोण आहोत?” ही व्यक्ती छान विचार मांडते- “एवढी मोठी सूर्यमाला- त्यात एक छोटीशी पृथ्वी- त्यात एक देश भारत- त्यात आपले एक राज्य- त्यात आपले छोटेसे घर व त्यात आपण म्हणजे विश्वाच्या कल्पनेत अगदी नगण्य.
खरे म्हणजे हे अशक्त मनाचे खेळ आहेत. माननीय वामनराव पै म्हणतात, ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’ म्हणूनच योग्य ज्ञान व विचार हवेत. मानवाला भगवंताने अमर्याद बुद्धी व कल्पनाशक्ती दिलेली आहे. आपण काय मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
शास्त्रकार सांगतात-

  • गाईच्या आंचलाकडे गेलेले वासरू दूध पिते तर त्यावर असलेला गोचीड रक्त पितो.
  • कमळ चिखलात वाढते- बेडूक त्या चिखलात लोळतो, पण भुंगा कमळातील मध उचलतो.
  • पूर्वजांनी सोन्याचे हंडे पुरून ठेवले आहेत, पण त्यांचे कुटुंबीय भीक मागतात.
  • आपल्या हृदयात राम आहे. त्या आत्मारामाला प्रगट करायला हवे.
    दुर्भाग्याने हे सगळे कळते पण वळत नाही. डॉक्टरांना व्यसनाबद्दल माहीत आहे पण तेच व्यसनाधीन होतात.
    मानवाला ज्ञानाबरोबर शहाणपण हवे. आपले व इतरांचे कल्याण कशात आहे हे त्याला माहीत हवे. ज्ञानाचा योग्य उपयोग करायला हवा. वाचनसंस्कृतीबद्दल बोलताना तज्ज्ञ सांगतात- ‘वाचाल तर वाचाल!’ उदा. बील गेट्स दर आठवड्याला म्हणे एक पुस्तक वाचतात. बाबासाहेब आंबेडकरांची बॅग पाण्यात पडली. त्यात पुस्तके होती. त्यांच्या तोंडून सहज उद्गार आले- ‘माझे सर्वस्व गेले!’ हे मोठे लोक वाचनाला एवढे महत्त्व देत होते. कारण त्यांना माहीत होते की वाचन बदलले तर जीवन बदलेल!
    शास्त्रकार म्हणतात, आज दर घरात दोन खोके शिरले आहेत.
  • टी.व्ही.च्या रूपात खुळे खोके.
  • फ्रीजच्या रूपात शिळे खोके.
    आता ‘मोबाईल’रूपात एक नवे खोके आले आहे. साधन वाईट नसते, त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक असते. त्यावरील कुठले विचार घ्यायचे व नको ते आपण ठरवायचे आहे. अंगावर पडलेले झुरळ आपण लगेच झटकतो तसे वाईट विचार लगेच झटकायला हवेत. नाहीतर विनाश नक्की.
    यासंदर्भात आपण काळजी घ्यायला हवी. आम्ही काळजी करतो पण काळजी घेत नाही.
    एका संस्थेने एक सर्वे केला. त्याप्रमाणे काही गोष्टींना प्राथमिकता द्यायची होती.
  • मुलींनी मुलाच्या आर्थिक उत्पन्नाला महत्त्व दिले.
  • मुलांनी मुलीच्या सौंदर्याला महत्त्व दिले.
  • पालक तोलामोलाचा मुलगा-मुलगी बघतात.
    शिक्षणाला दुसरा नंबर मिळाला. संस्कारांना आवश्यक तेवढे महत्त्व दिले गेले नाही.
    सध्या कुटुंबाची व समाजाची अवस्था दयनीय झाली आहे, याचे कारण हेच की संस्कारांचे महत्त्व कमी झाले आहे. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने या परिस्थितीवर चिंतन करण्याची वेळ आता आली आहे.