ज्ञानवापी मशिदीच्या ‘व्यास’ तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार बहाल

0
5

>> वाराणसी न्यायालयाचा निर्णय; सात दिवसांत पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाला निर्देश

वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार बहाल केला. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तेहखाना) मध्ये पूजा करू शकतात. सध्या मशिदीतील हा भाग बंद ठेवला गेलेला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पुढील सात दिवसांत हिंदूंना त्याठिकाणी पूजाअर्चा करण्याची व्यवस्था करून द्यावी, तसेच पुजारी नेमावा, असे निर्देश न्यायालयाने काल दिले.

वाराणसीमध्ये असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला ज्ञानवापी मशीद आहे. याच ज्ञानवापी मशीद परिसरात अगोदर मंदिर होते, असा दावा केला जात होता; तर मुस्लीम पक्षकारांकडून हा दावा फेटाळण्यात येत आहे. हा वाद सध्या न्यायालयात पोहोचलेला आहे. वाराणसी जिल्हा प्रशासनाने 24 जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील दक्षिणेकडे असलेल्या तळघराचा ताबा घेतला होता. आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक यांनी यासंबंधी खटला दाखल केला होता. त्यानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या दक्षिणेकडील तळघराचा ताबा वाराणसी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दिला होता.

ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांकडून 1993 पर्यंत पूजा करण्यात येत होती. तळघरात 31 वर्षांपासून म्हणजेच 1993 पासून पूजा थांबवण्यात आली होती. त्यानंतर व्यास तळघरात पूर्वंपार पूजा करणाऱ्या व्यास कुटुंबीयांनी पूजा करण्याचा अधिकार मागितला होता. सुमारे वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने व्यास कुटुंबीयांना पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता व्यास कुटुंबीय 7 दिवसांच्या आत पूजा करू शकतात. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुजाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासन सात दिवसांत तिथे व्यवस्था उभी करणार आहे. त्यानंतर हिंदू तिथे पूजाअर्चा सुरू करतील. काशी विश्वनाथ ट्रस्टकडून पूजापाठ केली जाईल. आमचे कायदेशीर लढाई होती, ती पूर्ण झाली आहे. यापुढे आता काशी विश्वनाथ पीठ ट्रस्ट निर्णय घेईल. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असा आहे. याआधी सरकारांनी सत्तेचा दुरूपयोग करून हिंदू समाजाची पूजापाठ रोखले होते, त्याला आज न्यायलयाने खोडून काढले आहे. यापुढे आता वजूखान्याचा सर्व्हे करणे, हे आमच्या लक्ष्य असेल, अशी प्रतिक्रिया हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली.

प्रत्येकाला पूजेची संधी मिळणार : जैन
ज्ञानवापी मशिदीतील व्यासाचे तळघर येथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने सात दिवसांच्या आत तिथे व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून तिथे प्रत्येकाला पूजा करण्याची संधी मिळेल, असे हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.