‘कामधेनू’च्या गायींना बसवणार आरएफआयडी चीप

0
0

>> पशुसंवर्धनमंत्री हळर्णकर यांची माहिती; गायी मोकाट सोडल्यास मालकांवर कारवाई

राज्य सरकारच्या कामधेनू योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गायींना आरएफआयडी चीप बसविण्याचा विचार सुरू आहे. या चीपमध्ये मालकाच्या आधार क्रमांकासह गायीचे विवरण असेल, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दरम्यान, कामधेनू योजनेअंतर्गत घेण्यात आलेली गाय रस्त्यावर मोकाट सोडून दिलेली आढळल्यास संबंधित लाभार्थ्याची कामधेनू योजना तत्काळ बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकताच दिला होता.
पशुसंर्वधन खात्याने कामधेनू योजनेतील गुरे मोकाट सोडण्याचे प्रकार रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू केला आहे. गायीला चीप बसविल्यानंतर गायीच्या मालकाने गायीला मोकाट सोडल्यास त्याची माहिती आधारकार्डद्वारे मिळणार असून त्या गायीच्या मालकावर कारवाई करणे शक्य होईल, असे नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

अनेकजण या योजनेतून गाय घेतात आणि नंतर तिला रस्त्यावर मोकाट सोडून देतात. गायीला चीप बसविल्यानंतर मालकाची जबाबदार वाढणार असून, गायीची योग्य प्रकारे देखभाल करण्याकडे तो लक्ष देईल. राज्यात मोकाट जनावरांचा स्थानिक तसेच वाहनचालकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांच्यामुळे जीवघेणे अपघात घडल्याच्याही घटना काही वर्षांत घडल्या आहेत, असेही हळर्णकर म्हणाले.