ज्ञानवापीच्या ‘व्यास तळघरा’त 31 वर्षांनी पूजा आणि आरती

0
3

>> वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रशासनाकडून त्वरित अंमलबजावणी

वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार बहाल केल्यानंतर बुधवारी मध्यरात्री 2 वाजता तेथील मूर्तींची पूजा करण्यात आली. दीपप्रज्वलन करून गणेश-लक्ष्मीची आरती करण्यात आली. तळघराच्या भिंतीवरील त्रिशूलासह इतर धार्मिक प्रतिकांचीही पूजा करण्यात आली.

जिल्हा दंडाधिकारी एस राजलिंगम बुधवारी सायंकाळी 7 वाजता पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. रात्री 8 वाजता अधिकाऱ्यांनी ज्ञानवापी तळघरात बाहेरून तपासणी केली. रात्री 9 वाजता काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्यानंतर प्रशासनाने गेट क्रमांक 4 मधून लोकांना प्रवेश बंद केला. कडेकोट बंदोबस्तात 9.30 च्या सुमारास विश्वनाथ मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजातून ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आणि बॅरिकेड्स हटवण्याचे काम सुरू झाले. रात्री 10.30 च्या सुमारास सुमारे तासाभरात बॅरिकेडिंग हटवण्यात आले.

यानंतर काशी विश्वनाथ ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी आतील स्वच्छता केली. ट्रस्टतर्फे पूजेचे साहित्य तळघरात आणण्यात आले. ट्रस्टच्या 5 पुजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर प्रार्थना करण्यात आली. पूजेच्या वेळी आयुक्त बनारस, सीईओ विश्वनाथ मंदिर, एडीएम प्रोटोकॉल, गणेशवर शास्त्री द्रविड आणि पंडित ओम प्रकाश मिश्रा तळघरात उपस्थित होते. गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या नेतृत्वाखाली विश्वनाथ मंदिराचे पुजारी ओमप्रकाश मिश्रा यांनी पूजा केली.

ओमप्रकाश मिश्रा हे काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाचे पुजारी आहेत. पूजेनंतर काही लोकांना चरणामृत आणि प्रसादही देण्यात आला. आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड यांनी कलशाची स्थापना केली. त्यानंतर मंत्रोच्चार करून गौरी, गणेश आणि लक्ष्मीला आवाहन केले. पुराधिपतीच्या अंगणात सर्व देवी-देवतांचे स्मरण व पूजा केली. तळघराच्या भिंतीवर भगवी वस्त्रे टाकून देवदेवतांना नैवेद्य, फळे अर्पण करून आरती करण्यात आली.