सर्बियाचा द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच व स्वित्झर्लंडचा तृतीय मानांकित रॉजर फेडरर यांनी दुसर्या फेरीचा अडथळा सहज पार करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला.
पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या तात्सुमा इटो या जपानच्या खेळाडूला जोकोविच याने १ तास ३५ मिनिटांत ६-१, ६-४, ६-२ असे लोळविले. फेडररलादेखील रॉड लेव्हर एरिनावर विजयासाठी फार मेहनत घ्यावी लागली नाही. फेडररने सर्बियाच्या फिलिप क्राईनोविचचा ६-१, ६-४, ६-१ असे पराजित केले. तिसर्या फेरीत जोकोविचसमोर जपानचा योशिहितो निशिहोका तर फेडररसमोर ऑस्ट्रेलियाचा जॉन मिल्मन असेल.
१८वा मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव, ३१वा मानांकित पोलंडचा ह्युबर्ट हुरकोझ व आठव्या मानांकित इटलीच्या माटियो बार्रेटिनी यांना पराभवामुळे पुुरुष एकेरीतून गाशा गुंडाळावा लावला. महिला एकेरीत २३वी मानांकित डायना यास्ट्रेमस्का, ११वी मानांकित आर्यना साबालेंका, १३व्या मानांकित पेट्रा मार्टिक यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.
सातव्या मानांकित पेट्रा क्विटोवा, अव्वल मानांकित ऍश्ले बार्टी व आठव्या मानांकित सेरेना विल्यम्स यांनी सरळ सेटमध्ये विजय प्राप्त करत दिमाखात तिसरी फेरी गाठली. झेक प्रजासत्ताकच्या पेट्राने स्पेनच्या पावला बाडोसा हिला ७-५, ७-५ असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने स्लोवेनियाच्या पोलोना हेरकोग हिला ६-१, ६-४ असे तुडवले. अमेरिकेच्या अनुभवी सेरेनाने स्लोवेनियाच्या तामारा झिदानेस्क हिचे आव्हान ६-२, ६-३ असे परतवून लावले.
अन्य महत्त्वाचे निकाल
पुरुष एकेरी ः दुसरी फेरी ः फाबियो फोनिनी (१२) वि. वि. जॉर्डन थॉम्पसन ७-६, ६-१, ३-६, ४-६, ७-६, मिलोस राओनिच (३२) वि. वि. क्रिस्टियन गारिन ६-३, ६-४, ६-२, ह्युबर्ट हुरकोझ (३१) पराभूत वि. जॉन मिलमन ४-६, ५-७, ३-६, माटियो बार्रेटिनी (८) पराभूत वि. टेनिस सेंडग्रेन ६-७, ४-६, ६-४, ६-२, ५-७
महिला एकेरी ः दुसरी फेरी ः मॅडीसन कीज (१०) वि. वि. आरांत्झा रस ७-६, ६-२, नाओमी ओसाका (३) वि. वि. सायसाय झेंग ६-२, ६-४, सोफिया केनिन (१४) वि. वि. ऍन ली ६-१, ६-३, मारिया सक्कारी (२२) वि. वि. नाओ हिबिनो ७-६, ६-४