जोकोविच ‘अव्वल १०’ खेळाडूंत

0
105

>> १५३ स्थानांच्या प्रगतीसह सेरेना २८व्या स्थानी

विंबल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत ‘टॉप १०’ मध्ये प्रवेश करताना १०वे स्थान मिळविले आहे. त्याने ११ क्रमांकांनी चढताना तब्बल ८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर अव्वल दहांत स्थान मिळविले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने तीन क्रमांनी वर चढताना पाचवे स्थान मिळविले आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा तीन स्थानांच्या घसरणीसह २७व्या स्थानी आला आहे. दिविज शरण याने मात्र कमालीची सुधारणा करत आठ स्थानांनी वर सरकताना ३६वे स्थान प्राप्त केले आहे.

विंबल्डन ग्रँडस्लॅमची उपविजेती ३६ वर्षीय सेरेना विल्यम्सने डब्ल्यूटीए क्रमवारीत महिला एकेरीमध्ये १५३ स्थानांची झेप घेत २८वा क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत पराभूत होऊनही रोमानियाच्या सिमोना हालेप हिने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. विजेत्या अँजेलिक कर्बरने सहा स्थानांची उडी घेत चौथे स्थान मिळविले आहे. मागील वेळच्या उपविजेत्या व यंदा तिसर्‍या फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या व्हीनस विल्यम्सची नवव्या स्थानावरून चौदाव्या स्थानी घसरण झाली आहे. माजी विजेत्या गार्बिन मुगुरुझा सातव्या स्थानी (-४) फेकली गेली आहे. सकारात्मक दिशेने वाटचाल केलेल्या अन्य खेळाडूंमध्ये ज्युलिया जॉर्जेस (+ ३, १०वे स्थान), किकी बर्टेन्स (+ ३, १७वे), डॉमनिका सिबुलकोवा (+ ७, २६वे ), कामिला जॉर्जी (+ १७, ३५वे ), से सु वेई (+ ११, ३७वे), ऍलिसन उतयावांक (+ ७, ४०वे) व आलेक्झांड्रा सासनोविच (+ ९, ४१वे ) यांचा समावेश आहे.

भारताच्या अव्वल तीन खेळाडूंनी प्रगती साधली आहे. अंकिता रैनाने १३ स्थाने वर सरकताना २०१वे, करमन थंडीने ९ स्थानांची उडी घेत २१६वे तर ऋतुजा भोसले हिने २५ क्रमांकांची सुधारणा करत ३९६वा क्रमांक आपल्या नावे केला आहे. दुहेरीत सानिया मिर्झाची घसरण सुरूच असून सात स्थानांनी खाली सरकताना ती ३७व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

डब्ल्यूटीए टॉप १० ः १. सिमोना हालेप (रोमानिया, ७५७१ गुण), २. कॅरोलिन वॉझनियाकी (डेन्मार्क, ६७४०), ३. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ५४६३), ४. अँजेलिक कर्बर (जर्मनी, ५३०५), ५. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ५०२०), ६. कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स, ४७३०), ७. गार्बिन मुगुरुझा (स्पेन, ४६२०), ८. पेट्रा क्विटोवा (झेक प्रजासत्ताक, ४५५०), ९. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ४४८५), १०. ज्युलिया जॉर्जेस (जर्मनी, ३९८०).
एटीपी टॉप १० ः १. राफेल नदाल (स्पेन, ९३१० गुण), २. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ७०८०), ३. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ५६६५), ४. युआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना, ५३९५), ५. केविन अँडरसन (द. आफ्रिका, ४६५५), ६. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया, ४६१०), ७. मरिन चिलिच (क्रोएशिया, ३९०५), ८. जॉन इस्नर (अमेरिका, ३७२०), ९. डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया, ३६६५), १०. नोवाक जोकोविच (सर्बिया, ३३५५).