जोकोविचचे आव्हान आटोपले

0
146

दक्षिण कोरियाचा स्टार खेळाडू चुंग हियोन याने याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत सहावेळच्या विजेत्या नोवाक जोकोविच याचा ७-६ (७-४), ७-५, ७-६ (७-३) असा पराभव केला. रॉड लेव्हर एरिनावर ३ तास २१ मिनिटे चाललेल्या या लढतीत २१ वर्षीय चुंग याने बाजी मारत धक्कादायक निकालाची नोंद केली. दोन वर्षांपूर्वी जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत चुंग याला पराजित केले होते. या पराभवाचा वचपा चुंग याने काल काढला.

उजव्या हाताचा गुडघा व कमरेच्या दुखापतीमुळे जोकोविचला आपला नैसर्गिक खेळ करता आला नाही. याचा फायदा उठवत चुंग याने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा चुंग हा दक्षिण कोरियाचा पहिला खेळाडू बनला असून उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याला अमेरिकेच्या टॅनी सेंडग्रेन याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. सेंडग्रेन यानेदेखील चुंग याच्याप्रमाणेच सनसनाटी निकालाची नोंद करत पाचव्या मानांकित डॉमनिक थिएम याला ६-२, ४-६, ७-६, ६-७, ६-३ असे हरविले. दुसरीकडे स्वित्झर्लंडच्या ३६ वर्षीय रॉजर फेडरर याला विजयासाठी तीन सेट पुरेसे ठरले.

८०व्या स्थानावरील मार्टन फुसकोविच याचा ६-४, ७-६, ६-२ असा पराभव करत फेडररने १४व्या वेळेस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. ‘अंतिम ८’ंमध्ये फेडररचा सामना झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिच याच्याशी होणार आहे. बर्डिचने फोगनिनी याचा ६-१, ६-४, ६-४ असा पाडाव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या दिविज शरण व अमेरिकेच्या राजीव राम या १६व्या मानांकित जोडीला उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित लुकास कुबोट व मार्सेलो मेलो यांच्याकडून ६-३, ६-७, ६-४ असा पराभव पत्करावा लागला. एदुआर्दो रॉजर वेसलिन व रोहन बोपण्णा या दहाव्या मानांकित जोडीलादेखील पराजित व्हावे लागले. सातव्या मानांकित मेट पाविच व ऑलिवर माराच यांनी फ्रान्स-इंडो जोडीला ६-४, ६-७, ६-३ असे नमविले.

निकाल ः महिला एकेरी ः चौथी फेरी ः सिमोना हालेप (१) वि. वि. नाओमी ओसाका ६-३, ६-२, अँजेलिक कर्बर (२१) वि. वि. सेह सू वेई ४-६, ७-५, ६-२, मॅडिसन कीज (१७) वि. वि. कॅरोलिन गार्सिया (८) ६-३, ६-२, कॅरोलिना प्लिस्कोवा (६) वि. वि. बार्बरा स्ट्रायकोवा (२०) ६-७, ६-३, ६-२