जॉन फर्नांडिस यांची हकालपट्टी

0
184

लुईझिन फालेरो नवे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
कॉंग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून वादग्रस्त बनलेल्या जॉन फर्नांडिस यांची अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदावरून काल उचलबांगडी केली. त्यांच्या जागी अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सरचिटणीस व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नियुक्ती झाली आहे. जॉन फर्नांडिस यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाच्या बहुतेक ज्येष्ठ नेत्यांसंदर्भात बेधडक विधाने करून त्यांचा रोष ओढवून घेतला होता. पक्षात शिस्त आणण्याची भाषा करीत त्यांनी प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्वतःच्या समर्थकांची वर्णी लावली होती.जॉन फर्नांडिस यांची एकंदर कार्यपद्धती आणि पक्षाचे आमदार व ज्येष्ठ नेत्यांविषयी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे त्यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत होती. त्यांच्याविषयी अनेक कागाळ्या श्रेष्ठींपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे जॉन यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र, औपचारिक घोषणा होणे बाकी होते.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फालेरो यांची गोवा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे पक्ष संघटनात्मक सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी काल जाहीर केले.
अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीमध्येही अनेक फेरबदल होऊ घातले असून सरचिटणीसपदी असलेल्या अनेक नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत जाऊन महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. फालेरो यांच्यावर ईशान्य राज्यांची जबाबदारी पक्षाने सोपवली होती.
सध्या महाराष्ट्र व हरियाणात निवडणुकांचा मोसम असल्याने तूर्त कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आलेले नसले, तरी निवडणुकांची धामधूम आटोपताच फेरबदल केले जातील अशी चिन्हे आहेत.
लुईझिन फालेरो प्रारंभी गोवा प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास राजी नव्हते. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती स्वीकारण्यास आपण तयार असेन असेही त्यांनी जॉन फर्नांडिस यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींशी तक्रारी वाढल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना स्पष्ट केले होते.
फालेरो सोनियांना भेटले
ताज्या घटनाक्रमानंतर लुईझिन फालेरो यांनी काल कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. ते आज गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
जॉन फर्नांडिस यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाच्या बर्‍याच नेत्यांना अडचणीत आणून त्यांची नाराजी ओढवून घेतली होती. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे हेही त्यांच्या भूमिकेमुळे अडचणीत सापडले. कॉंग्रेस भवनमधील पत्रकार परिषदे दरम्यान भालचंद्र नाईक यांनी दहेज मिनरल्सच्या एका कामासाठी राणे यांनी रक्कम उकळल्याचा आरोप फर्नांडिस यांच्या उपस्थितीत केला होता.
जॉन फर्नांडिस यांनी गेल्या डिसेंबरमध्ये प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यातील कॉंग्रेस गटसमित्या बरखास्त करून नव्या समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू केली होती.