चिपळूण रेल मार्गावर मालगाडी घसरल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प

0
104
चिपळूण येथे रेल्वेमार्गावरून घसरलेल्या मालगाडीचे डबे असे विखुरले होते.

चिपळूण येथे मंगळवारी पहाटे कोकण रेल मार्गावर मालवाहू गाडी घसरल्याने झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवावी लागली. मांडवी एक्सप्रेस व जनशताब्दी या रेलगाड्या रद्द केल्या. तर अन्य वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली.मांडवी एक्सप्रेस व जनशताब्दी या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काल सकाळी करमळी, मडगाव रेल्वे स्थानकावर वरील रेलगाडीतून प्रवास करण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची तिकिटे रद्द करून घेण्यासाठी गर्दी झाली होती. गेले पाच दिवस सलग सुट्टी असल्याने अनेक पर्यटक गोव्यात आले होते. काल मंगळवारी अनेक कुटुंबे रेल्वेतून जाण्यासाठी स्थानकावर आली होती. रेल मार्गावरील वाहूतक बंद केल्याची माहिती मिळाल्याने त्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, मार्ग खुला करण्याचे काम चालू होते. रेलगाडीचे दहा डबे कोसळल्याने काल संध्याकाळपर्यंत वाहतूक सुरू होणे अडचणीचे असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले. आज पहाटे पर्यंत वाहतूक सुरू व्हावी म्हणून युद्धपातळीवर काम सुरू आहे. चिपळूणमध्ये अनेक प्रवाशी अडकून पडले होते.