जेटी धोरणाविरोधात रविवारी ‘चलो आझाद मैदान’

0
14

>> गावागावांतून हजारो आंदोलक पणजीतील आझाद मैदानावर धडकणार

राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने व विशेषत: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जेटी धोरण होणार्‍या विरोधाला न जुमानता ते अंमलात आणण्याचे ठरविल्याने राज्यात तीव्र असंतोष पसरला असून, या धोरणाला एकजुटीने विरोध करण्यासाठी रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी ‘चलो आझाद मैदान’ या शीर्षकाखाली आंदोलन छेडण्यात येणार आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो आंदोलक दुचाक्या घेऊन आझाद मैदानावर धडक देणार आहेत.

या आंदोलनात सासष्टी तालुक्यातून जास्त आंदोलक सहभागी व्हावेत, यासाठी गावोगावी जागृती सुरू आहे. राय, लोटली, कामुर्ली, ओर्सी, चांदर, बोरी, शिरोडा, करमणे, केळशी, असोळणा, वेळ्ळी व अन्य भागातून लोक आंदोलनात भाग घेणार आहेत. रविवारी होणार्‍या आंदोलनासाठी गावागावांतून अनेक आंदोलक बाहेर पडतील आणि ते दुचाकी मिरवणुकीने आझाद मैदानावर जमतील.

गावागावांत ग्रामसभांतून या धोरणाला विरोध करणारा प्रस्ताव संमत झाला आहे. सदर जेटी धोरण म्हणजे सागरमाला प्रकल्प पुढे रेटण्याचा डाव आहे, असा संशय लोकांना आहे.
केंद्र सरकारने लोकांच्या विरोधासमोर नमते घेऊन सागरमाला प्रकल्प गुंडाळून ठेवला होता; पण आता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली मागील दरवाजाने जेटीच्या रूपाने सागरमाला प्रकल्प आणण्याचे ठरविल्याचा संशय आंदोलकांना आहे. हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे.