जुने गोवे भीषण अपघातात ९ वाहनांचे लाखोंचे नुकसान

0
100

>> सुदैवाने किरकोळ दुखापतींवर निभावले

 

जुने गोवे येथील हातखांब जंक्शनवर काल संध्याकाळी झालेल्या एका विचित्र भीषण अपघातात ९ वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात दोन ट्रक, सहा कारगाड्या व एका दुचाकीचा समावेश आहे. उतारावर एका ट्रकने समोरील ट्रकला धडक दिल्यानंतर त्या ट्रकने इतर वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या अपघातात किरकोळ दुखापत वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
हा अपघात हातखांब जंक्शन येथे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेश नोंदणीचा यूपी २१ एएन ३६०४ हा ट्रक पणजीहून जुने गोवेच्या दिशेने जात होता. हातखांब येथे पोहोचताच त्या ट्रकच्या चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक वेगाने पुढे गेला व त्याने त्याच्यापुढील जीए ०४ डी ४१५८ या ट्रकला जोरदार धडक दिली. ट्रकची जोरदार धडक बसल्याने दोन्ही ट्रकांची समोरील वाहनांना जोरदार धडक बसली. त्यात होंडा सिटी, स्विफ्ट, बलेनो, इनोव्हा, पोलो व अल्टो या कारगाड्यांचा तसेच एका दुचाकीचे प्रचंड प्रमाणात नुकसात झाले. या अपघात इनोव्हा, बलेनो, होंडा सिटी या आलिशान कारगाड्यांबरोबरच बहुतेक गाड्यांचा चक्काचूर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. आणि या अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले.