‘विराट’ ला निरोप

0
89

भारतीय नौदलाचे भूषण राहिलेल्या आयएनएस विराटवरील नौदलाचा ध्वज काल मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून उतरवण्यात आला. यापुढे ती एक तर संग्रहालयाचे रूप घेईल वा भंगारात काढण्यासाठी गुजरातमधील आळंदची वाट धरील. आयएनएस विक्रांतचे जे झाले तेच विराटचेही होणार आहे. पण मागे राहणार आहेत त्या या अजस्त्र विमानवाहू नौकेच्या अनंत आठवणी. तसे पाहाता विराटने गेली तब्बल सहा दशके सागरावर राज्य केले. आधी २७ वर्षे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा भाग म्हणून आणि गेली तीस वर्षे भारतीय नौदलाचे भूषण म्हणून. आजवर ११ लाख नाविक मैल पादाक्रांत केलेल्या आणि या दरम्यान तब्बल २७ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून आलेल्या आयएनएस विराटला मोडीत काढणे आज अपरिहार्य ठरलेच होते. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जेव्हा या युद्धनौकेची निर्मिती झाली, तेव्हा अनेक कारणांसाठी ती विक्रमी ठरली होती. यंत्रसामुग्रीचे रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रण करणारी ती पहिली युद्धनौका होती. संपूर्ण वातानुकूलित असलेलीही ती सर्वांत पहिली युद्धनौका होती. प्रत्येक कर्मचार्‍यासाठी स्वतंत्र ‘बंक’ ची सोयही तिच्यावर होती. विन्स्टन चर्चिलच्या पत्नीने जलावतरण केलेल्या ‘विराट’ चा समावेश भारतीय नौदलात झाला तेव्हापासून ‘विराट’ आणि ‘विक्रांत’ हे भारतीय नौदलाचे दोन डोळेच बनून राहिले होते. भारताच्या नाविक सामर्थ्याची ती निशाणी होती. आधी सागरी युद्धात आघाडी सांभाळणारी, नंतर कमांडोवाहू, पाणबुडीरोधक आणि शेवटी विमानोड्डाणाचा सागरातील तळ अशा विविध भूमिका निभावलेल्या ‘विराट’ चे ऐतिहासिक कार्य आता संपुष्टात आले आहे. एकेकाळी तिची जोडगोळी असलेल्या ‘विक्रांत’ ला बुडविण्यासाठी पाकिस्तानने पाठवलेल्या ‘गाझी’ युद्धनौकेलाच कशी जलसमाधी घ्यावी लागली, त्यावरील ‘गाझी अटॅक’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांत झळकला. ‘विक्रांत’ काही काळ मुंबईत प्रदर्शनीय स्थितीत राहिली आणि शेवटी भंगारात निघाली. ज्या कंपनीने ते पोलाद लिलावात खरेदी केले, तिने आपल्या मोटारसायकलींची जाहिरात करताना ‘विक्रांत’चे पोलाद त्यात वापरल्याचे सांगून नव्या पिढीच्या देशभक्तीला साद घालून फायदा उठवला. ‘विक्रांत’ नंतर ‘विराट’ ही आता त्याच मार्गाने जाणार आहे. तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यात यावे अशी मागणी होत असली आणि देशातील चार पर्यटक बंदरांपैकी एके ठिकाणी ती प्रदर्शनीय स्थितीत ठेवण्याचा विचार नौदल प्रमुखांनी व्यक्त केला असला, तरी अशा प्रकारे प्रदर्शनीय स्थितीत एवढी मोठी युद्धनौका ठेवणे हे खूप खर्चिक काम आहे. आंध्र प्रदेश सरकारने विशाखापट्टनम बंदरात तिचे संग्रहालय करण्याची इच्छा प्रदर्शित केली असली तरी त्यासाठी किमान हजार कोटी रुपये लागतील. एकावेळी वीस विमाने, आठ हेलिकॉप्टरे आणि एकविसशे कर्मचारी तैनात असलेल्या नावाप्रमाणेच विराट असलेल्या ‘विराट’ ची इतिश्री खंतावणारी जरी असली तरी काही गोष्टी अपरिहार्य असतात. समाधानाची बाब एवढीच की नौदलाने ‘विक्रांत’ आणि ‘विराट’ ची उणीव भरून काढणारी ‘विक्रमादित्य’ यापूर्वीच सेवेत रुजू केलेली आहे आणि पूर्णतः भारतीय बनावटीची नवी ‘विक्रांत’ साकार होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात जुनाट युद्धनौकांसाठी उसासे टाकणे योग्य ठरणार नसले तरीही ‘आयएनएस विराट’ हा अनेक पिढ्यांसाठी एक अभिमानाचा विषय बनून राहिला होता हे विसरता येणार नाही. श्रीलंकेतील शांतीसेनेपासून ऑपरेशन पराक्रमपर्यंत अनेक मोहिमांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या आणि आजवर भारतीय नौदलाचा अभिमानविषय बनून राहिलेल्या ‘विराट’वरचा सूर्य मावळताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारच!