जी-20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात

0
5

>> जगभरातील नेते भारत भेटीवर

>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची उपस्थिती

भारताची राजधानी दिल्लीमध्ये शनिवार दि. 9 व रविवार दि. 10 सप्टेंबर असे दोन दिवस आयोजीत करण्यात आलेल्या जी-20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जी 20 परिषदेसाठी जगभरातील नेते भारतभेटीवर येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन हे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतभेटीवर येत असून जी-20 परिषदेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली नगरी सज्ज झाली आहे.

जी-20 परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारताकडून जोरदार तयारी केली जात आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरातील प्रमुख नेत्यांच्या पाहुणचारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये म्हणून सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

चीन व रशियाचे राष्ट्रपती सहभागी होणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे नेत्यांना उपस्थित राहता येत नाही. परंतु त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते आपले प्रतिनिधी पाठवतात. त्यामुळे या परिषदेमध्ये प्रत्येक व्यक्ती गंभीरपणे सहभागी होत आहे असे सांगून, परिषदेसाठी कोण येत आहे? कोण येणार नाही? यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक देश परिषदेच्या माध्यमातून आपल्या देशाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या परिषदेतून काय हाती लागते, कोणत्या विषयावर चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे असेल अशी प्रतिक्रिया दिली.

भारत चीन संबंधांवर परिणाम?
जी-20 शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अनुपस्थित राहणार असून चीनने कमी महत्त्वाच्या म्हणजे राज्य परिषदेच्या पंतप्रधानांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान ली कियांग नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

अनुपस्थिती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. 2013 साली सत्तेत आल्यापासून शी जिनपिंग हे पहिल्यांदाच जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, याबाबतची लेखी पुष्टी अद्याप झालेली नाही.

उपस्थित राहणारे प्रतिनिधी

राजधानी दिल्लीत पार पडणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-द-सिल्वा आदि नेते उपस्थित राहणार आहेत.

सोन्या-चांदीच्या
भांड्यातून जेवण

जी-20 शिखर परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना चांदी आणि सोन्याच्या भांड्यातून जेवण दिले जाणार आहे. ही भांडी खास कारागिरांकडून भारतीय संस्कृतीप्रमाणे तयार करण्यात आली आहेत. परिषदेतील प्रतिनिधींसाठी 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत दुपार आणि रात्रीच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे.