जी-२० संमेलनात सहभागासाठी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल

0
25

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शुक्रवारी १६ व्या जी-२० शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी इटलीच्या रोममध्ये दाखल झाले. सन २०२० मध्ये कोरोना संक्रमणाने जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर थेट उपस्थिती दर्शवणारे हे पहिलेच जी-२० शिखर संमेलन होत आहे.

दरम्यान, आपल्या इटली दौर्‍याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोमच्या ‘पियाजा गांधी’ला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करत पुष्पहार अर्पण केला.
यावेळी येथे जमलेल्या जमलेल्या भारतीय समाजातील लोकांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी – मोदी’ अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरपर्यंत जी २० देशांच्या समूहाच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी रोममध्ये राहतील. त्यानंतर २६ व्या ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’मध्ये आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या शिखर बैठकीतही ते सहभागी होण्यासाठी ते ब्रिटनच्या ग्लासगोला रवाना होतील. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक आरोग्य’ या विषयावर चर्चा होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी ‘प्रिन्स ऑफ वेल्स’कडून हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात खासगी अर्थव्यवस्थेच्या भूमिकेवर चर्चा होईल. यासोबतच दुसर्‍या दिवशी जागतिक नेते हवामान बदल आणि पर्यावरण, शाश्वत विकासासह इतर मुद्द्यांवरही चर्चा करतील.