विरोधकांचे सवतेसुभे

0
37

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर गोव्यात आहेत. ममतांच्या ह्या दौर्‍यादरम्यान पक्षाची पाळेमुळे राज्यात भक्कमपणे रुजविण्याच्या दृष्टीने काही बड्या नेत्यांना आणि प्रादेशिक पक्षांना आपल्यासोबत घेण्याचा जोरदार प्रयत्न त्यांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ कडून चालला होता, परंतु त्याला फारसे यश येताना सध्या तरी दिसत नाही. अनेक छोटे मासे गळाला लागले असले तरी बडे मासे अजून साशंक दिसतात. त्यामुळे पक्षात मोठ्या अपेक्षेने नव्याने आगमन केलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे आणि स्थानिक नागरिक, विविध समाजघटक, पत्रकार आदींशी संवाद साधून आपली आगामी रणनीती सुनिश्‍चित करण्यापुरता हा दौरा सीमित उरला आहे.
ममता बॅनर्जींचे वावरणे अत्यंत साधे जरी असले तरी त्यांच्याभोवती एक वलय निश्‍चितपणे आहे. पश्चिम बंगालमध्ये जंग जंग पछाडूनही भारतीय जनता पक्षाला त्यांना सत्तेवरून पायउतार करता न आल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे भाजपचा माज उतरवणारी रणरागिणी म्हणून देश ममतांकडे पाहतो. त्यामुळे गोव्यातील त्यांचे आगमन हेही एका नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरू शकते हे गोमंतकीय जनता जाणते. तेवढ्या तयारीनिशीच तृणमूल येथे उतरलेला आहे. ममतांचे येथे आगमन होताच त्यांना काळे झेंडे दाखवले जाणे किंवा त्यांच्या पोस्टर्सवर काळे फासणे यातून भाजपने ममतांच्या गोव्यातील आगमनाचा धसका घेतला आहे हे प्रतीत होते आहे. अशा प्रकारचे अत्यंत नकारात्मक राजकारण आजवर गोव्यात कधीही खेळले गेले नव्हते, परंतु ममतांच्या संदर्भात ही नकारात्मक रणनीती भाजपचा आत्मविश्वास डळमळू लागल्याचे संकेत नकळत देत चालली आहे आणि ममतांच्या चेहर्‍याला काळे फासल्याने उलट भाजपचीच प्रतिमा कलंकित होते आहे. त्यामुळे अशा प्रकारांपासून पक्षाने दूर राहायला हवे.
खरे तर तृणमूलच्या गोव्यातील आगमनाचा प्रत्यक्ष झटका कॉंग्रेसला बसला. लुईझिन फालेरोंसारखे नाही म्हटले तरी राष्ट्रीय पातळीवर नाव असलेले नेते पक्षाला रामराम करून चालते झाले. परंतु पक्षाचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांची तृणमूलबाबतची प्रतिक्रिया समंजस दिसली. ‘आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस गोव्यात वरून लादले गेले आहेत आणि येत्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव किरकोळ राहील’ एवढेच ते म्हणाले. मात्र, भाजपने मात्र आता बंगालमधील निवडणूक हिंसाचाराचे लोण गोव्यात येईल असे जे अकांडतांडव चालवले आहे ते तृणमूलला गरजेपेक्षा अधिक गांभीर्याने घेतल्याचेच सिद्ध करते आहे.
राज्याची आगामी निवडणूक आप आणि तृणमूलसाठी प्रयोगभूमी राहणार आहे. ‘आप’ ने २०१७ मध्ये एकदा हात पोळून घेतले आहेत. परंतु यावेळी अधिक ताकद लावून पुनश्च हरिओम् केले आहे. तृणमूल गोवा आणि त्रिपुराच्या माध्यमातून पश्चिम बंगालबाहेर प्रथमच दमदार पाऊल टाकते आहे. त्रिपुरामध्ये यापूर्वी पक्षाचे अस्तित्व होते, परंतु गोवा मात्र त्यांना संपूर्णपणे नवीन आहे. त्रिपुरामध्ये बंगाली समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. गोव्यात तो नाममात्र आहे. ‘फीश अँड फुटबॉल’ हे गोवा आणि बंगालमधील साम्य असल्याचे ममता सांगत असल्या, तरी दोन्ही प्रदेशांतील मतदारांत बरीच भिन्नता आहे. तृणमूलचे चाणक्य सध्या त्याचा बारकाईने अभ्यास करीत असले तरी एवढ्या अल्पकाळामध्ये गोमंतकीय मतदारांना आपल्याबाजूने वळविण्यासाठी आवश्यक संघटनात्मक यंत्रणा त्या पक्षापाशी नाही.

राज्यात उसळलेल्या भाजप सरकारविरोधी लाटेवर स्वार होण्याचा आटापिटा जरी ह्या नव्याने उगवलेल्या पक्षांनी चालवलेला असला तरी जोवर विरोधी पक्ष एकत्रितपणे ही लढाई लढणार नाहीत, तोवर मतविभाजनाचा फायदा सत्ताधारी भाजपलाच होणे अटळ आहे. त्यामुळे विरोधकांकडून एकत्रीकरणाच्या दिशेने किती प्रयत्न येणार्‍या काळात होतात त्यावर गोव्याच्या नशिबी २०२२ मध्ये काय वाढून ठेवले आहे ते राहील.
तृणमूलचा विलीनीकरणाचा प्रस्ताव गोवा फॉरवर्डला अमान्य आहे, परंतु युतीला त्यांची ना नाही. कॉंग्रेसने आपल्याशी युती करावी म्हणूनही सरदेसाई देव पाण्यात घालून बसले आहेत. आधी त्यांनी गणेश चतुर्थीची मुदत दिली होती. आता दिवाळीची दिली आहे, परंतु कॉंग्रेसचा प्रतिसाद थंडाच दिसतो. काही जागा प्रादेशिक पक्षांसाठी सोडल्या जाणे शक्य आहे अशी गुळमुळीत भूमिका चिदंबरम यानी युतीसंदर्भात मांडली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष जर एकत्र येणार नसतील तर भाजपला निवडणुकीत आव्हान कसे निर्माण होईल हे भाजपला सत्तेवरून पायउतार करण्याच्या गर्जना करीत गोव्यात आलेल्या या नेत्यांनी सांगायला नको?