जीसीएवर प्रशासकाची नेमणूक करा

0
87

>> विधानसभेत मिकी पाशेकोंची मागणी

 

गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्या लोकांनी कोट्यवधी रु.चा घोटाळा केला त्याच लोकांच्या हातात पुन्हा जीसीएचा कारभार गेलेला आहे. सरकारने अशा लोकांची तेथून हकालपट्टी करावी व जीसीएवर प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी काल आमदार मिकी पाशेको यांनी गोवा विधानसभेत केली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार किरण कांदोळकर, मिकी पाशेको, प्रमोद सावंत, नीलेश काब्राल व सुभाष फळदेसाई यांनी जीसीएसंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता.
यावेळी बोलताना पाशेको म्हणाले, की ज्या लोकांनी जीसीएमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे व ज्यांना या आरोपाखाली अटकही झाली होती, त्या जीसीएच्या पदाधिकार्‍यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जीसीएचा ताबा घेतलेला आहे. या लोकांची तेथून हकालपट्टी करण्याची गरज असताना क्रीडा खाते बघ्याची भूमिका का घेत आहे असा सवाल यावेळी पाशेको यांनी केला.
यावेळी बोलताना क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणाले की, जीसीएतील भ्रष्टाचाराचा विषय हा आजचा अथवा कालचा नव्हे. ९७ साली जीसीएत मोठा तिकीट घोटाळाही झाला होता. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने पेंडसे आयोगाची स्थापना केली होती. २००३ साली पेंडसे आयोगाने अहवाल सादर केला. पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस सरकारने हा अहवाल फेटाळला. पण नंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने अहवालचा फेरआढावा घेतला आणि कारवाई सुरू केली. हल्लीच जो मोठा घोटाळा उघड झालेला आहे त्या प्रकरणी जीसीएच्या तिघा पदाधिकार्‍यांना अटक झालेली असून पुढील चौकशी चालू असल्याचे तवडकर यांनी सांगितले.
यावेळी पाशेको यांच्याबरोबरच नीलेश काब्राल, प्रमोद सावंत आदीनीही भ्रष्टाचार केलेले पदाधिकारीच जीसीएचा कारभार सांभाळत असून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, यावेळी उत्तर देताना रमेश तवडकर म्हणाले की, या प्रकरणी क्रीडा खात्याला जे काही करणे शक्य होते ते खात्याने केले
आहे.