‘जीसीए’त लोटलीकर पॅनलची बाजी

0
111

सूरज लोटलीकर यांच्या पॅनलने गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) निवडणूकीत काल बाजी मारली. सचिवपदासाठीच्या लढतीत विनोद फडके यांचे पूत्र विपुल फडके (७८) यांनी हेमंत आंगले (२४) यांचा पराभव केला. गोवा जलतरण संघटनेचे माजी सचिव सय्यद अब्दुल माजिद यांनी सह सचिवपदासाठी ८१ मते मिळवता आपले निकटचे प्रतिस्पर्धी सुदेश प्रभुदेसाई (२२) यांना पराजित केले. परेश गोविंद फडते (८३) यांची खजिनदार म्हणून निवड झाली. या पदासाठी निवडणूक लढविलेल्या प्रशांत फातर्पेकर यांना केवळ २० मते मिळाली. मोहन चोडणकर (८४ मते) यांनी रोहन गावस देसाई (१९) यांचा सदस्यपदासाठीच्या निवडणूकीत दारुण पराभव केला. अध्यक्षपदी सूरज लोटलीकर यांची व उपाध्यक्षपदी शांबा देसाई यांची यापूर्वीच निवड झाली होती. गोव्यासाठी क्रिकेट मैदान उभारणी हे आपले पहिले लक्ष्य असल्याचे श्री. लोटलीकर यांनी आपल्या पॅनलच्या घवघवीत यशानंतर सांगितले. भविष्यात सर्व क्लबांच्या सहकार्यानेच संघटना पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. क्लबांच्या पाठिंब्यामुळेच लोटलीकर पॅनलचा विजय झाल्याचे चेतन देसाई (माजी अध्यक्ष) व विनोद फडके (माजी सचिव) यांनी सांगितले.