जीवन ः एक संघर्ष

0
363
  • प्राजक्ता प्र. गावकर
    (नगरगाव – वाळपई)

सून चांगली मिळाली. हसतमुख, सुस्वभावी, सुंदर. तिने या घरात येऊन सार्‍या घराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता नारायणाचा संघर्ष जवळजवळ संपला. कारण बायकोला पाहणारं कुणीतरी आहे…

जीवनगाणे गातच रहावे, झाले गेेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच रहावे ॥

हे जरी खरे असले तरी जीवन फार खडतर असते. आयुष्याचा खरा अर्थ कुणाला कळला आहे? जीवनात असंख्य चढउतार असतात. जीवनाच्या वाटा हिरवळीचे मऊ गालीचे अंथरल्यासारख्याही असू शकतात. पण जास्तीत जास्त याच्या वाटा काटेरी, दगडधोंड्याच्या असतात. असे म्हणतात की आयुष्य हे दिल्याघेतल्यासारखे असते. जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. सर्वांनाच त्यातून जावे लागते. यात व्यावहारिक, कौटुंबिक व इतर प्रकारचे संघर्ष गणले जातात.
नोकरीसाठी चांगल्या सुशिक्षित तरुणांना संघर्ष करावा लागतो. चांगली पदवी पदरात पडूनही त्यांना सुखासुखी नोकरी मिळू शकत नाही. कित्येकदा आपण पाहतो.. सुशिक्षित तरुण बेरोजगार होऊन आपला लाखमोलाचा जीव गमावतात.

शेतकर्‍यांचा तर संघर्ष चालूच असतो. कधी पीक चांगले येऊनही चांगल्या भावात विकले जात नाही तर कधी अवकाळी पावसामुळे सार्‍या पिकाची वाट लागते. कांद्यासारखे पीक चांगले भरघोस प्रमाणात आले तर योग्य तो मोबदला सरकारकडून मिळत नाही. परिणामी ते पीक रस्त्यावर किंवा नदीत फेकून दिले जाते.
आता परवाच टीव्हीवर बातमी पाहिली- एका शेतकर्‍याने निराश होऊन तुर्‍याला आलेल्या आपल्या शेतावर नांगर फिरवला. पहा, किती कष्टाने उभे केलेले शेत! त्याला संघर्षाला तोंड द्यायची हिंमत झाली नाही. याचा परिणाम सार्‍या शेतावरून नांगर फिरला.
जीवन हे दुःखाचा महासागर आहे. आपल्याला सर्वांनाच तो महासागर हसत हसत पार करायचा आहे. संघर्षाशिवाय जीवन असूच शकत नाही.
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहे… त्यावेळी म्हणजे ते लहान असताना घरात आईवडील, बहीण व हा छोटा नारायण (ते गृहस्थ) एवढी चारच माणसं होती. त्यांचे छोटेसे भाट नारळांचे आणि गायी- म्हशी असे गोधन होते. वडील भाटात देखरेख करायचे. गुरं सांभाळायचे. कालांतराने बहिणीचे लग्न झाले. तिला चांगले स्थळ मिळाले ती आपल्या सासरी गेली. आता घरात इन मिन तीनच माणसं. सर्व व्यवस्थित चालले होते. नारायणाचे शिक्षण संपून तो विवाहयोग्य झाला. आईवडील आता वृद्ध झाले. आता घर नारायणालाच चालवावे लागणार होते.
त्याने भाटात लक्ष द्यायला सुरुवात केली. घरचे गोधन सांभाळू लागला. त्यांचे चारा-पाणी, गोठा साफ करणे, दूध काढणे व ते डेअरीला पोचविणे. हे सर्व करून घरातले स्वयंपाक-पाणीही करू लागला. कारण आई आता थकली होती. तिच्याच्याने घरातले काम होत नव्हते.

तिने नारायणाच्या बाबांकडे तगादा लावला, ‘‘माझ्याच्याने घरातले काम होत नाही आताशा. नारायणाच्या दोनाचे चार हात करा. माझ्या भावाची मुलगी वंदना सुंदर आहे. चांगली आहे. तिलाच मागणी घालू या’’.
नारायणाचे वडील म्हणाले, ‘‘तू म्हणतेस तर घालू या मागणी. पण नारायण काय म्हणतोय ते पहा आधी.’’
नारायणाचा विचार काय आहे असे त्याच्या आईने त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुम्हाला जसे हवे तसे करा. माझी हरकत नाही. मला फक्त तुमची काळजी घेणारी आणि घरातले सर्व करून चांगली राहणारी बायको हवी.’’ अशाप्रकारे नारायणाकडून हिरवा कंदील मिळताच त्यांच्या आईने आपल्या भावाला कळवून वंदनाला मागणी घातली.
आणि इथेच जरा नारायणाकडून चूक झाली, ती अशी की मामाची मुलगी असूनसुद्धा वंदनाला तो पूर्णपणे ओळखत नव्हता. लग्न झाले आणि वंदना नारायणाच्या घरी आली. नारायणची आई एकदम खूश होती कारण भावाची मुलगी सून करून घेतलीय. आता ती सर्व व्यवस्थित करणार. आपल्याला आता काम झेपत नाही. आ काळजी नाही असे म्हणून ती माउली निर्धास्त झाली. पण….

इथूनच तर नारायणाचा संघर्ष सुरू झालाय अबोल, अंतर्मुख वंदना बस म्हटले की बसायची; ऊठ म्हटले की उठायची. सांगितल्याशिवाय ती एकही काम करत नसे. तर या वंदनाने लग्नाला चार दिवस व्हायच्या आत विहिरीतच उडी मारली. धावाधाव करून तिला कशीबशी बाहेर काढली. शुद्धीवर आल्यावर तिला सासूने विचारले, ‘‘अशी कशी पडलीस?’’ ती प्रश्‍न ऐकून हसतच बसली होती आणि दोनच शब्द बोलली, ‘‘उडी मारली.’’
नारायणाने विचारले, ‘‘का मारलीस उडी?’’ परत दोनच शब्द बोलली, ‘‘विहिरीचा तळ बघायला.’’ सर्वांनी कप्पाळावर हात मारून घेतला. घरात कुणालाच माहीत नव्हते की वंदना मनोरुग्ण आहे! नंतर नंतर तिचे घरातले वागणे पाहून नारायण काय समजायचे ते समजला. आपल्या दुर्दैवाला दोष देत नारायणाने वंदनाला सांभाळायचे ठरवले.

वंदना एकही काम नीट करत नसे. पाच जणांचा स्वयंपाक ती पंचवीस जण जेवतील एवढा करून ठेवी. दोन माणसांचा चहा ती पातेलंभर करून ठेवत असे. आंघोळीला गेली तर भरून ठेवलेल्या सर्व बादल्या, सारे पाणी तांब्यावर तांबे ओतून घेत राही. झाडून काढ म्हटले तर झाड झाड झाडतच राही.
नारायणची आई नारायणाला होणारा त्रास पाहून झुरून झुरून गेली. त्यालाच आता घरादाराचे व वडिलांचे सर्व करून वर बायकोलाही सांभाळावे लागे. काळ जात होता. नारायणाला दोन मुलगे झाले. नशिबाने दोन्ही मुलगे नारायणासारखे चांगले निपजले. हुशार, तल्लख बुद्धीचे!
नारायणच संघर्ष चालूच होताय बायको बरी व्हावी म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा घालवला. पण ते शक्य झालेच नाही.

आता हल्लीच त्याच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले. सून चांगली मिळाली. हसतमुख, सुस्वभावी, सुंदर. तिने या घरात येऊन सार्‍या घराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता नारायणाचा संघर्ष जवळजवळ संपला. कारण बायकोला पाहणारं कुणीतरी आहे… ही भावनाच त्याला आनंद देणारी होती. नारायणाप्रमाणे खूप जणांना आपल्या आयुष्यात असा संघर्ष करावा लागतो.