जीवनाचे तत्त्वज्ञान जाणून घ्या

0
177

योगसाधना – ५०८
अंतरंग योग – ९३

  • डॉ. सीताकांत घाणेकर

महाभारतात ‘यक्ष प्रश्‍न’ म्हणून एक अत्यंत ज्ञानपूर्ण प्रकरण आहे. त्यामध्ये यक्ष युधिष्ठिराला काही प्रश्‍न विचारतात. त्यामध्ये एक प्रश्‍न असा होता…जीवनाची क्षणभंगुरता माहीत असूनसुद्धा मानव त्याप्रमाणे वागत का नाही? ही अजब, आश्‍चर्याची गोष्ट आहे. तसे पाहिले तर या यक्ष प्रश्‍नांमध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अत्यंत उपयुक्त ज्ञान आहे.

भगवंताने अत्यंत कुशलतापूर्वक प्रेमाने बनवलेल्या या अफाट विश्‍वात बहुतेक घटना अनिश्‍चितच असतात. मानवाची कुठलीही इच्छा असू दे, कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी निश्‍चित फळ मिळेलच याची बहुतेकवेळा खात्री नसते. पण योगसाधक- कर्मयोगी त्यामुळे खचून जात नाही तर आपल्या निश्‍चित केलेल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न चालू ठेवतो. कारण त्याला एका गोष्टीचे ज्ञान असते की त्याचा हक्क फक्त कर्मावरच आहे, फळावर नाही. भगवंत एक दिवस ठरल्यावेळी फळ नक्कीच देईल. त्यामुळे कर्मावरील त्याची पकड ढिली होत नाही. तो निश्‍चिंत असतो- आपल्या लाडक्या सर्वसमर्थ भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून!
ह्या अशा अशाश्‍वत विश्‍वात एक गोष्ट मात्र नक्की आहे- ती म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे, त्याचा मृत्यू निश्‍चितच होणार आणि तो केव्हा होणार हे जरी ठरलेले असले तरी त्याला त्याचे ज्ञान नसते. काळाची टांगती तलवार सतत त्याच्या डोक्यावर असते.

प्रत्येक माणसाला- सुशिक्षित-अशिक्षित; श्रीमंत-गरीब; तरुण-वृद्ध… हे नक्की माहीत असते. त्याशिवाय हे त्रिकालाबाधित सत्य आहे की आपण कुठलीही भौतिक संपत्ती स्वतःबरोबर घेऊन जाणार नाही. जाईल ते फक्त आपले कर्म. आश्‍चर्याची व धक्कादायक गोष्ट म्हणजे हे माहीत असूनदेखील बहुतेकजण फक्त भौतिक संपत्तीच्या मागेच जातात. जीवनाचा आनंददेखील घेत नाहीत.
जाणकार म्हणूनच सांगतात –

‘धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि सखा स्मशाने |
देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः॥

  • धन भूमीमध्ये राहते- कारण पूर्वी मनुष्य कमावलेले धन भांड्यात घालून जमिनीखाली गाडून ठेवत असत.
  • पशू गोठ्यांतच बांधलेले राहणार.
  • पत्नी उंबरठ्यापर्यंतच येणार- कारण भारतात महिला स्मशानात जात नाहीत. (हल्ली प्रथा थोडी बदलते आहे.)
  • मित्रपरिवार स्मशानापर्यंत.
  • देह चितेपर्यंत सोबत देतो. त्यानंतर त्याची राख होते.
  • त्याच्यापुढील अखंड प्रवासात कर्मच सोबत येते.
    त्यामुळे प्रत्येकाने होईल तेवढे सत्कर्म जमवायला हवे.
    हे फार गुह्य तत्त्वज्ञान आहे. पण आपल्या महान ज्ञानी ऋषीमहर्षींनी प्रतीकांच्या रूपात हे फार कठीण तत्त्वज्ञान अगदी सोपे केले आहे.
  • मडके – हे प्रतीक आम्हाला आमच्या अगम पथाच्या प्रवासासाठी जागृत करते. तसे देहाची क्षणभंगुरता सुंदर रितीने समजावते.
    महाभारतात ‘यक्ष प्रश्‍न’ म्हणून एक अत्यंत ज्ञानपूर्ण प्रकरण आहे. त्यामध्ये यक्ष युधिष्ठिराला काही प्रश्‍न विचारतात. तेव्हा ह्या संदर्भातदेखील एक प्रश्‍न होता.
  • जीवनाची क्षणभंगुरता माहीत असूनसुद्धा मानव त्याप्रमाणे वागत का नाही? ही अजब, आश्‍चर्याची गोष्ट आहे. तसे पाहिले तर या यक्ष प्रश्‍नांमध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अत्यंत उपयुक्त ज्ञान आहे.
    भारतीय तत्त्वज्ञानात पंचमहाभूतांना- पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश ह्यांना देव मानलेले आहे. वेळोवेळी त्यांची पूजा केली जाते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता वेगवेगळ्या तर्‍हेने व्यक्त केली जाते. त्यामुळे ती मानवी जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहिली आहेत.
  • अग्नी – त्याला अग्निदेव असे संबोधतात.
  • गृहस्थाश्रमाला सुरुवात करतेवेळी अग्नीला साक्षी ठेवून विवाह होत असतात. आतादेखील होतात.
  • हा अग्नी आपल्या वास्तूत सतत प्रज्वलित राखत असत आणि तोच अग्नी अंत्ययात्रेच्यावेळी मडक्यामधून स्मशानात नेला जातो व देहाला अग्नी देण्यासाठी तो अग्नी वापरला जातो.
  • आप्तेष्टांच्या मृत्यूवेळी अत्यंत दुःखात असणार्‍या व्यक्तींना थोडा दिलासा मिळावा म्हणून त्यावेळी-
    ‘जयराम श्रीराम – जयराम श्रीराम… असे चालताना म्हटले जाते त्यामुळे वातावरणात पावित्र्यही येतेे. हे दृश्य पाहून समजणारा आपल्या नश्‍वर जीवनाचे सत्य जाणतो. त्याला ‘स्मशान वैराग्याची’ अनुभूती येते.
    आजच्या तथाकथित प्रगत काळात शव वाहनातून नेले जाते. बहुतेक लोक आपापल्या वाहनांत परस्पर स्मशानातच जातात. मग हे भजन करणार कोण? अवश्य, भारतातील अनेक खेड्यांमध्ये ही प्रथा अजून चालू आहे. सिनेमांतदेखील हे दृश्य आवर्जून दाखवले जाते.
    दुर्भाग्य म्हणजे- हे एक कर्मकांडच राहिले आहे. त्यामागील भाव नष्ट झाला आहे.. अज्ञानामुळे! त्यामुळे ह्या विधीचे पावित्र्य नष्ट झाले आहे. म्हणूनच स्मशानात विविध गटांमध्ये लोक अनेक विषयांवर चर्चा करतात. फक्त जवळचे नातेवाईक दुःखी होऊन तिथे व्यर्थ चिंतन करीत बसतात. असो.

अग्नी देतेवेळी- गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पारायण सर्वांनी करायचे अशी प्रथा आहे. हा पुरुषोत्तम अध्याय आहे. शास्त्रकार सांगतात-

  • त्यामुळे स्मशानातील वातावरणात एक पवित्र चैतन्य येते. तसेच त्या मृतात्म्याला सद्गती प्राप्त होते. आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणेच तो आत्मा त्या स्थळीच असतो.- जे घडते ते बघतो व ऐकतो.
    श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात-

‘इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ |
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ (गीता १५.७)

  • ‘‘हे निष्पाप अर्जुना! असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.’’
    प्रत्येक मानव मृत्यूला फारच घाबरतो. कारण मृत्यूबद्दल भारतीय दृष्टिकोनाबद्दल आपण अज्ञानात अथवा त्यापेक्षा महाभयंकर विपरीत ज्ञानांत आहोत. बहुतेकजण मृत्यूला अमांगलिक घटना मानतात. आपण जर जीवनाकडे पाहण्याची सुयोग्य दृष्टी संवर्धिली तर आम्हाला मृत्यूमधील मांगल्य समजेल.
    पू. पांडुरंगशास्त्रीजी सांगतात-
  • जीवन म्हणजे शिवाने जिवाला भेटायला येणे आणि मृत्यू म्हणजे जिवाने शिवाला भेटायला जाणे. कदाचित म्हणूनच आपल्या चिंतनशील विचारवंतांनी भगवान शंकराचे निवासस्थान स्मशान कल्पिलेले असेल. असा हा सुंदर ज्ञानपूर्ण व भावपूर्ण विचार देऊन त्यांनी आपली मृत्यूबद्दल असलेली भीती कमी करण्याचा एक अत्यंत रमणीय प्रयत्न केला आहे.
    संत कबीर तर मृत्यूची अतिसुंदर कल्पना मांडतात-

‘कर ले शृंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना होगा,
मिट्टी उढावन मिट्टी बिछावन, मिट्‌टी में मिल जाना होगा |
नाह ले धो ले शीष गुँथा ले, फिर वहॉं से नहीं आना होगा|’

भारतातील अनेक समाजांत शवयात्रा वाजतगाजत स्मशानात नेली जाते. कदाचित ह्या प्रथेमागेदेखील हीच भावना व संकेत असू शकतो.
शास्त्रीजी म्हणतात –
‘‘मरणाच्या दुःखाची विवाहानंतर कन्येला निरोप देण्याच्या प्रसंगाशी तुलना होऊ शकते. नववधूने पतीगृही जाण्याचे दुःख नाही, उलट आनंदच आहे. दुःख आहे फक्त माहेर सोडण्याचे. त्याचप्रमाणे मरणार्‍याला जेथे जायचे आहे त्याचे दुःख राहण्याचे कारण नाही. परंतु येथे बांधलेले भावसंबंध सोडून जावे लागते आणि त्याने हृदय व्यथित होते.’’
तत्त्ववेत्ते सांगतात-
‘‘मुलाच्या जन्माच्यावेळी मूल रडते पण नातेवाईक हसतात- आनंदात असतात. पण मृत्युच्यावेळी हे उलट असते. मरणारा शांत असतो व इतर आप्तजन रडतात. अर्थात तोच व्यक्ती शांत असतो, ज्याने जीवनभर सत्कर्म, परोपकार, इतरांचे कल्याण केलेले असते. म्हणून प्रत्येकाला समज दिली जाते की जीवन कसे जगायचे ते.
‘मरावे परि कीर्तीरूपे उरावें |’

मानवाने इतरांना फसवायचा, लुटण्याचा प्रयत्न केला तर त्याला ह्या संसारात तात्कालिक यश मिळेल. पण चित्रगुप्त क्षणोक्षणी त्याचे गुप्त चरित्र लिहितो- हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवे व त्याप्रमाणे आचरण करायला हवे. यमधर्मापासून कुणालाही सुटका नाही.
आज विश्‍व कोरोनाच्या राज्यांत महाभयंकर यातना भोगीत आहे. दर दिवशी- हजारो मृत्यू होतात. विश्‍वभर तर लाखो झालेत. यातून कुणालाही सवलत नाही. सुटका नाही. श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, स्त्री-पुरुष, तरुण-वयस्क, छोटा-मोठा, सर्व व्यावसायिक… स्मशानात अग्नी द्यायला किंवा शव गाडायला देखील जागा नाही. अशावेळी उच्च तत्त्वज्ञान प्रत्येकाने आत्मसात करून इतरांना समजवायला हवे. काळाची ती गरज आहे.
आपले योगसाधक असे करतच असतील ना?
(संदर्भ- ‘संस्कृती-पूजन’- प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले)
अंत्ययात्रा (भजनासह), स्मशान गप्पागोष्टी, आजची शवांची शोकांतिका