गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या पन्नास मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
राज्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ मार्च 2025 मध्ये पूर्ण होत आहे. यापूर्वी 22 मार्च 2020 रोजी जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यात आली होती. गोवा राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत मतदारसंघाची फेररचना करण्याचे निर्देश जारी केले आहेत. आता, प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक अधिकारी आणि मामलेदारांची साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार (निवृत्त, आयएएस) यांनी जारी केला आहे.