>> कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांचा आरोप
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला. तसेच लोकांना १० हजार नोकर्यांचे आमिष दाखवले याचा भाजपला निवडणुकीत मोठा फायदा झाला. तसेच विरोधकांना कसलीच कुणकुण लागू न देता सरकारने निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्याचाही सत्ताधार्यांना मोठा फायदा मिळाला, असे काल कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकारांशी अनधिकृतरित्या बोलताना सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकातील पराभवाची जबाबदारी ही कुणा एकाची नसून ती सर्वांची आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. आता पुढे काय करायचे याचा विचार सर्वांनी मिळून करायला हवा. त्यासाठी पक्ष संघटनेची पुनर्रचना करावी लागणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण करावे लागेल. पक्षाला लोकांचे प्रश्न घेऊन लढावे लागेल, असे ते पुढे म्हणाले. विरोधी पक्षांचे आमदार फोडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद या सगळ्याचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जे आमदार पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांना परत उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
पुढील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष एखाद्या पक्षाशी युती करील काय, असे विचारले असता आपणाला त्यासंबंधी काहीही बोलायचे नसल्याचे ते म्हणाले. आपण येथे पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.
पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यासाठी गोवा भेटीवर आलेल्या दिनेश गुंडू राव यांनी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व आमदार प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व अन्य नेत्यांची भेट घेऊन पक्ष संघटनेविषयी तसेच पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. आजही ते अन्य काही कॉंग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत.